वाराणसीतील भारत माता मंदिर


प्राचीन वाराणसी नगरी ही मंदिरांची नगरी मानली जाते. येथे प्रत्येक गल्लीत एखादे तरी मंदिर, मशीद, गुरुद्वारा अथवा चर्च आहे. या सर्व दाटीत येथे एक अनोखे मंदिर सुद्धा उभे आहे आणि त्याची स्थापना १९३६ मध्ये झाली आहे. या मंदिरात कोणत्याही देवाची मूर्ती नाही. हे मंदिर आहे आपली मातृभूमी भारत मातेचे. येथे कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे.

त्या काळात जेव्हा भारतावर ब्रिटीश राज्य होते तेव्हा वाराणसीतील एक धनिक शिवप्रसाद गुप्त यांनी या मंदिराचा खर्च केला आहे. ते स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी सैनिकांना अनेक प्रकारे मदत करत असत. विशेष म्हणजे ते एकदा मुंबई भेटीवर आले असताना पुण्यात महर्षी कर्वे यांच्या विधवा आश्रमाला (हिंगणे स्त्री शिक्षण संस्था) भेट देण्यासाठी आले. या आश्रमात त्याकाळी मातीचा भारत मातेचा नकाशा तयार केला होता. या नकाशात नद्या, पर्वत असे उंच सखल भागही अतिशय चांगल्या प्रकारे दाखविले गेले होते. त्यातून गुप्त याना प्रेरणा मिळाली. त्यांना वाराणसीत सर्व धर्माचे लोक येऊ शकतील असे एक मंदिर बांधायचे होते. हिंगणे आश्रमातील भारताचा नकाशा पाहिल्यावर त्यांनी तसेच मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि ते प्रत्यक्षात बांधले.


येथे भारतमातेचा नकाशा संगमरवरात कोरला गेला आहे. त्यातही डोंगर, नद्या, समुद्र दाखविले गेले आहे. ३१.२ फुट बाय ३०.२ फुट आकाराचा हा भव्य नकाशा ११ इंची ७६२ तुकड्यातून तयार केला गेला आहे. यात अफगाणिस्थान, बलुचिस्तान, तिबेट, म्यानमार, लंका, मलय यांचाही काही भाग दाखविला गेला आहे. मंदिराभोवती विशाल उद्यान असून मंदिरात अनेक शिलालेख आहेत. दरवाज्यावर वंदे मातरम गीत कोरले गेले आहे. या मंदिरात जाणारा कोणीही खरा भारतीय भारतमाता की जय म्हटल्याशिवाय राहत नाही असेही सांगितले जाते.

Leave a Comment