निर्भया गुन्हेगारांच्या फाशीनंतर गावकरी साजरी करणार दिवाळी


दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने निर्भया रेपकेस प्रकरणातील चारही दोषी गुन्हेगारांच्या फाशीसाठी २२ जानेवारीची तारीख नक्की केल्यामुळे समाधान पावलेले निर्भयाच्या मूळ गावातील रहिवासी फाशी अमलात आल्यावर गावात दिवाळी साजरी करणार आहेत. निर्भयाचे मुळ गाव उत्तरप्रदेशातील बलिया जवळ मेडवरकाला येथे आहे. मंगळवारी निर्भया आरोपींच्या फाशीची तारीख जाहीर झाल्यावर या गावात आनंदाची लाट उसळली. गावातील लोकांनी गेली सात वर्षे आम्ही यासाठी प्रतीक्षा करतो आहोत असे सांगून उशिरा का होईना पण आमच्या मुलीला न्याय मिळाला अश्या भावना व्यक्त केल्या.

निर्भयाचे आजोबा लालजीसिंग म्हणाले, अपराध्यांना शिक्षा मिळण्यासाठी इतका वेळ मिळायला नको होता. पण अजूनही ते किती वेळ काढतील हे माहिती नाही. तेव्हा ते खरेच फासावर चढले की मगच मी त्यांना शिक्षा मिळाली यावर विश्वास ठेवेन. वास्तविक अश्या गुन्ह्यात गुन्हेगारांना दोन ते तीन महिन्यात शिक्षा मिळायला हवी तरच अश्या गुन्ह्यांना आळा बसू शकेल. निर्भयाच्या चुलत बहिणीने आम्ही याच शिक्षेची वाट पाहत होतो आता आम्ही त्या आनंदाप्रीत्यर्थ सण साजरा करू अशी प्रतिक्रिया दिली.

याच भागात फौजींचे गाव अशी ओळख असलेल्या बसंतपूर मधील युवकांनी निर्भयाच्या हत्त्याऱ्यांना फाशी झाली की गावाचे युवक गरजूंसाठी रक्तदान करणार असल्याचे सांगितले. तर या गावातील किन्नर अनुष्का शर्माच्या म्हणण्यानुसार ते पूर्ण जिल्ह्यात सण साजरा करणार आहेत.. अनुष्काच्या मते बलात्कारी गुन्हेगारांना फाशी देण्यापेक्षा त्यांचे हातपाय तोडून जन्मभर त्यांना अपंगाचे जिणे जगायला लावले पाहिजे तरच अश्या गुन्हेगारांना थोडी जरब बसेल.

Leave a Comment