भारताचा ‘हिंदुस्थान’ उल्लेख केल्यामुळे पुणे न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांना समन्स


पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून भारताचा उल्लेख हा हिंदुस्थान असा करण्यात येत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील न्यायालयाने समन्स बजावले आहे.

वारंवार ‘हिंदुस्थान’ असा उल्लेख शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून भारताचा केला जातो. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी यावर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी पुणे न्यायालयात पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली.

सोमवारी ही याचिका दाखल करुन घेत पुणे न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांना समन्स बजावले आहे. 11 फेब्रुवारीला या दोघांनाही पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हेमंत पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी ही याचिका दाखल केली होती.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच ‘सामना’ दैनिकाचे संपादकपद सोडले होते. शिवसेनेचे ‘सामना’ हे मुखपत्र आहे. पण दोन पदांवर एकाच वेळी राहू शकत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे संपादकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आधी कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत ‘सामना’चे संपादक आहेत.

Leave a Comment