अमेरिका-इराण तणावामुळे मुकेश अंबानींचे 9333 कोटींचे नुकसान!


मुंबई : भारतीय शेअर बाजारात अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे सोमवारी मोठी घसरण झाल्यामुळे 788 अंकांनी बीएसई सेन्सेक्स गडगडला. सामान्य गुतंवणूकदारांचे या घसरणीमुळे नुकसान तर झाले, त्यासोबतच देशाचे सर्वात श्रीमंत उद्योजक आणि एकाच दिवसात रिलायन्स इंटस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना 9333 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुकेश अंबानी यांच्यासोबतच शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही सोमवारी केवळ एकाच दिवसात सुमारे 136 कोटी रुपये गमावले.

भारतीय शेअर बाजारातही पश्चिम आशि‍यात असलेल्या संकटाच्या शक्यतेचे परिणाम दिसले. सर्वच क्षेत्र लाल निशाण्यावर होते. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक सोमवारी व्यवहारादरम्यान सेन्सेक्समध्ये घसरण होऊन तो चार महिन्याच्या निचांकी स्तरावर (40613) पोहोचला. तर राष्ट्रीय निर्देशांक निफ्टी 12 हजारांपेक्षाही खाली गेला. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 787.98 अंक म्हणजेच सुमारे 1.90 टक्क्यांनी घसरुन 40,676.63 वर बंद झाला.

भारताच्या अनेक दिग्गज उद्योजक-व्यापाऱ्यांच्या खासगी संपत्तीतही यामुळे जबरदस्त घसरण झाली. फोर्ब्स रिअल टाईम बिलिअनेरी इंडेक्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2.2 टक्के म्हणजेच सुमारे 9333 कोटी रुपये घसरण झाली. त्यांच्या एकूण संपत्तीत घट होऊन 57.6 अब्ज डॉलर झाली आहे. अशाचप्रकारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची खासगी संपत्तीत 0.75 टक्के म्हणजेच सुमारे 136 कोटी रुपये घसरण झाली आहे.

गुतवणूकदारांना शेअर बाजारातील सोमवारच्या घसरणीमुळे एकूण 2.97 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारातील भांडवलात कपात होऊन 153.90 लाख कोटी रुपयेच राहिले आहे. हे भांडवल याआधी 156.87 लाख कोटी रुपये होते. सोमवारी आशियातील सर्व प्रमुख बाजारात घसरण पाहायला मिळाली. टोकिओच्या निक्केई 225, दक्षिण कोरियाच्या कोस्पी आणि S&P ASX 200 मध्ये घसरण झालेली दिसली.

Leave a Comment