फडणवीस सरकारने पाच वर्षांत महाराष्ट्र ओरबाडून खाल्ला – अनिल गोटे


धुळे – तत्कालीन फडणवीस सरकारवर भाजपमधुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले नेते अनिल गोटे यांनी गंभीर टीका केली आहे. फडणवीस सरकारने पाच वर्षांत महाराष्ट्र ओरबाडून खाल्ला अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे. हजारो कोटींचे घोटाळे देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तसेच स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याएवढे भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीच सत्तेत आले नसल्याचेही ते म्हणाले.

डिसेंबर महिन्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत धुळे शहरातील भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. गोटे यांनी महानगरपालिका निवडणुकीपासून पक्षात राहून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीत आल्यानंतरही अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका सुरु ठेवली आहे.

पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून खाल्ला. अतिशय जबाबदारीने मी हे वक्तव्य केले आहे. याचे पुरावे देखील मी देऊ शकतो. पुराव्याशिवाय, कागदपत्राशिवाय मी कधीच बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले. शिवस्मारकाच्या कामात एवढा घोळ केला आहे की, उभ्या महाराष्ट्राने पायताणाने त्यांना मारले पाहिजे. शिवाजी महाराजांनाही सोडले नसल्याचे अनिल गोटे यांनी म्हटले आहे. जर देवेंद्र फडणवीस यांना मोपलवार यांच्या एवढा भ्रष्ट माणूस चालत असेल तर काय बोलायचे आणि काही सांगायची गरजच नाही. माझ्याकडे प्रत्येक गावात काय घोटाळा केला आहे याची यादी असल्याचे सांगताना अनिल गोटे यांनी समृद्धी महामार्गातही घोटाळा झाल्याचा आरोप केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील लोकांचा विश्वास उडाल्याचे सांगताना फडणवीस यांच्या खोटारडेपणाला कंटाळून मी राजीनामा दिल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले. अनिल गोटे यांनी आपल्या पक्ष सोडण्याचे कारण सांगताना देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप केला. त्यांच्यावर मनापासून मी प्रेम केले. पण ते सगळ्या गुंड, बदमाशांचे साथीदार आहेत हे लक्षात आले. पक्ष सामान्य माणसांचा असतो. आता सगळी राजघराणी आमच्या पक्षात आल्याचे ते म्हणाले होते. राजघराण्यांसाठी पक्ष चालवता का ? शेवटचा गरीब माणूस आपल्या पक्षात राहील असे मी म्हटले असते. पण यांना राजघराण्याची पडली असल्याची टीका अनिल गोटे यांनी केली आहे.

Leave a Comment