सुरु झाला अहमदाबादचा पतंग महोत्सव


फोटो सौजन्य रेडीफ
गुजराथच्या अहमदाबादमध्ये यंदाचा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव ७ जानेवारीपासून सुरु झाला असून तो १४ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. गुजरातमध्ये हा महोत्सव साजरा करण्याची परंपरा प्राचीन आहे आणि त्याला उत्तरायण म्हटले जाते. मकरसंक्रांतीला म्हणजे १४ जानेवारीला सूर्याचा उत्तर गोलार्धाच्या दिशेने प्रवास सुरु होतो याला सूर्याचे उत्तरायण सुरु झाले असे म्हटले जाते. हा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव गुजराथ पर्यटन विकास महामंडळ भरविते.

या दिवसापासून हवामानात बदल होतात. थंडीची तीव्रता कमी होऊ लागते. दिवस मोठा होऊ लागतो आणि सुखद वारे वाहू लागतात. याच दिवसात नवीन धान्य तयार झालेले असते. हा काळ सर्वाना आनंददायी ठरवा म्हणून पतंग उडविले जातात. पतंग उडविण्यातून हा आनंद मिळविला जातो आणि लहानथोर सारे या आनंदात सहभागी होतात.


गुजराथ मध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची सुरवात १९८९ पासून झाली. यंदा या महोत्सवाचे ३० वे वर्ष आहे. दरवर्षी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या परदेशी लोकांची संख्या वाढतीच असून जगाच्या पाठीवरील अनेक देश या स्पर्धेत आवर्जून सहभागी होतात. याचे मुख्य आकर्षण असते ते विविध रंगाचे, आकाराचे पतंग. दरवर्षी बेस्ट पतंग स्पर्धाही होते. मुख्य कार्यक्रम अहमदाबाद साबरमती रिव्हर फ्रंटवर असतो आणि या काळात अहमदाबादचे आकाश लाखो पतंगांनी व्यापलेले असते.


दिवसभराचा पतंग उडविण्याचा आनंद सायंकाळ उतरू लागली की अधिक वाढतो कारण या वेळी आकाशात आत दिवे असलेले लाखो आकाशकंदील सोडले जातात आणि आकाशीच्या चांदण्या पृथ्वीवर आल्याचा भास निर्माण होतो. रात्री उशिरा आतषबाजीने पुन्हा एकदा आकाश उजळते. मकर संक्रांतीच्या अगोदरच्या रविवारपासून हा महोत्सव सुरु होतो आणि मकरसंक्रांतीला संपतो. संपूर्ण गुजराथच नव्हे तर भारताच्या अनेक राज्यात यावेळी पतंग उडविण्याची प्रथा आहे.

Leave a Comment