आगीशी लढून दमलेल्या वडिलांचा फोटो मुलीने केला शेअर


ऑस्ट्रेलियातील जंगलात भडकलेली आग अजूनही आटोक्यात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच या आगीशी लढून दमलेल्या आणि काही क्षणाची विश्रांती घेण्यासाठी घरासमोरच्या हिरवळीवर झोपलेल्या वडिलांचा फोटो मुलीने इंटरनेटवर शेअर केला असून अल्पावधीत त्याला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जेंनी ओ किफी नावाच्या ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स मध्ये राहणाऱ्या मुलीने ४ जानेवारीला हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.

फोटोसोबत जेनी लिहिते, माझ्या वडिलांचा हा फोटो. घरासमोर हिरवळीवर ते पाच मिनिटांची झोप घेण्यासाठी पहुडले आहेत. गेले महिनाभर जंगलात लागलेली आग विझविण्यासाठी ते अन्य सहकाऱ्याबरोबर काम करत आहेत. गेले दहा दिवस सतत १२-१२ तास ते आगीशी झुंझत आहेत. ते दमलेत आणि त्यांना विश्रांतीची फार गरज आहे. गेला महिनाभर आम्ही सारेच आगीशी लढतो आहोत. पण आज मी वडिलांना निराश झालेले आणि रडताना पहिले. ते म्हणतात ही आग कधीच संपुष्टात येणार नाही असे वाटते आहे. माझ्या वडिलांना आमच्या आधाराची गरज आहे.

जेनी लिहिते, ऑस्ट्रेलियात उन्हाळ्याचे अजून किमान ५० दिवस शिल्लक आहेत आणि आगीचे तांडव शमण्याची कोणतीही लक्षणे नाहीत. ऑस्ट्रलिया जळतेय आणि केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेक जण आग विझविण्याच्या कामी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करत आहेत. आमचे आयुष्य आणि घरे सुरक्षित रहावीत म्हणून झटत आहेत. त्या साऱ्यांना धन्यवाद.

Leave a Comment