आपल्या आवडत्या ‘ग्रीन हॅट’चा लिलाव करुन आगीतील पीडितांना मदत करणार शेन वॉर्न


आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत परिधान केलेली हिरव्या रंगाच्या टोपीचा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न लिलाव करणार असून शेन वॉर्नने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, या लिलावातून मिळणाऱ्या पैशातून ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीतील पीडितांना मदत करणार आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर त्याने सोमवारी एक पोस्ट शेअर ही घोषणा केली. लिलाव सुरू झाल्याच्या पहिल्या काही तासांत ही बोली 3 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे दीड कोटी रुपये) च्या पुढे गेली. या टोपीसाठी 12 जानेवारीपर्यंत बोली लावता येणार आहे.


आपल्या पोस्टमध्ये वॉर्नने लिहिले आहे की, आमचा आत्मविश्वास ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे डगमगला आहे. या भयंकर आगीचा परिणाम एवढ्या लोकांवर होत आहे, ज्याची कल्पना देखील करता येणार नाही. अनेकांनी या आगीमुळे आपले प्राण गमावले. घरे जळून खाक झाली आहेत आणि 50 कोटींहून अधिक जनावरे या आगीत भस्मसात झाले आहेत. अशा या कठीण प्रसंगी प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे. तसेच पीडितांना आम्ही दररोज मदत आणि सहयोग करण्याचे मार्ग शोधत आहोत. या कारणामुळेच मी माझी आवडती ‘बॅगी ग्रीन कॅप (350)चा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कॅप मी माझ्या पूर्ण कसोटी कारकिर्दीत परिधान करत होतो.

शेवटच्या ओळीत वॉर्नने लिहिले की, ज्यांना मदतीची गरज आहे अशा सर्वांना मदत करण्यासाठी माझी ही बॅगी ग्रीन कॅप काही महत्त्वपूर्ण निधी गोळा करू शकेल अशी मला आशा आहे. याअगोदर ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल आणि डार्सी शॉर्ट सारख्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी बिग बॅश लीगमध्ये त्यांच्या वतीने मारण्यात येणाऱ्या प्रत्येक षटकारावर 250 ऑस्ट्रेलियन डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे.

मदतनिधी गोळा करण्यासाठी आंदोलनात इतर खेळांमधील खेळाडू देखील सहभागी झाले आहेत. टेनिसस्टार मारिया शारापोव्हा आणि नोवाक जोकोविच यांनी सुद्धा ऑस्ट्रेलिया बुशफायर रिलीफ फंडसाठी स्वतःकडून 25-25 हजार डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment