या अ‍ॅपद्वारे केवळ अंगठ्याच्या ठशाने करता येणार पेमेंट

डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण मागील काही दिवसात वाढले आहे. अनेकजण आता यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करताना दिसतात. आता डिजिटल पेमेंटसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) भीम आधार अ‍ॅप लाँच केले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही विना कार्ड आणि यूपीआयचे केवळ अंगठ्याच्या ठशाने पेमेंट करू शकाल.

यासाठी एसबीआयने एक हटके सेवा सुरू केली असून याचा फायदा ग्राहकच नाही तर दुकानदारांना देखील होईल. एसबीआयच्या या अ‍ॅपद्वारे ग्राहक केवळ आधारकार्डच्या नंबरद्वारे पेमेंट करू शकतील.

अ‍ॅप असे करेल काम –

या अ‍ॅपचा उपयोग करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुकानदार यावर रजिस्टर्ड असणे गरजेचे आहे. नोंदणी करण्यासाठी दुकानदाराला नाव, पत्ता, फोन नंबरसह अन्य माहिती द्यावी लागेल. यासोबतच त्याला खात्याची माहिती द्यावी लागेल. बँक खाते हे आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. रजिस्टर केल्यानंतर दुकानदाराला ग्राहकाकडून पेमेंट स्विकारण्यासाठी एक मशीन दिली जाईल. ज्यामध्ये ग्राहकांचे फिंगरप्रिंट घेतले जाईल. हे STQC सर्टिफाइड FP स्कॅनर असेल, जे दुकानदाराच्या अँड्राईड  अ‍ॅपशी कनेक्ट असेल.

बँकेने म्हटले आहे की, भीम आधार अ‍ॅपद्वारे पेमेंट करणे खूप सोपे आणि सुरक्षित असेल. यासाठी खरेदीनंतर केवळ बँकेचे नाव निवडून आधार नंबर आणि पेमेंटची रक्कम दुकानदाराच्या मोबाईलमध्ये टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर फिंगरप्रिंट स्कॅनरच्या मदतीने अंगठा स्कॅन करावा लागेल. असे केल्यांतर पेमेंटची रक्कम दुकानदाराच्या खात्यात जमा होईल. हे अ‍ॅप दुकानदार गुगल प्ले स्टोरवरून मोफत डाउनलोड करू शकतात.

 

Leave a Comment