तेजस प्रवासात घरफोडी झाली तर मिळणार १ लाखाची भरपाई


इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसी तर्फे धावणाऱ्या दुसऱ्या खासगी रेल्वेचे वेळापत्रक जारी केले गेले असून ही तेजस अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या मार्गावर धावणार आहे. विशेष म्हणजे या ट्रेनच्या प्रवाशाना एक खास सुविधा मिळणार असून या ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाच्या घरी चोरी झाली तर १ लाख रुपये विमा भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी प्रवाशांना कोणताही जादा चार्ज भरावा लागणार नाही. या साठी लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीबरोबर सहकार्य करार केला गेला आहे.

अहमदाबाद मुंबई तेजसचे उद्घाटन १७ जानेवारीला होत असून सर्वसामान्य प्रवासी त्यातून १९ जानेवारीपासून प्रवास करू शकणार आहेत. या प्रवासाचे बुकिंग १० जानेवारी पासून सुरु होत आहे. अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल हे अंतर ही गाडी सहा तासात कापेल आणि आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावेल. गाडी नियोजित वेळेपेक्षा १ तास उशिरा पोहोचली तर प्रवाशांना १०० रुपये आणि त्यापेक्षा अधिक उशिरा पोहोचली तर २५० रु. भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी आयआरसीटीसी सर्व प्रवाशांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवेल. त्यावर क्लिक करून भरपाईचा क्लेम करता येणार आहे.

देशातील ही दुसरी खासगी ट्रेन असून पहिली ट्रेन लखनौ दिल्ली दरम्यान सुरु आहे. या तेजस ट्रेनच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान २५ लाख रुपयाचा रेल्वे प्रवास विमा मोफत उपलब्ध करून दिला गेला आहे.

Leave a Comment