अशा सुधारा आधार कार्डवरील चुकीची माहिती


युनिक आयडेंटीफिकेशन ऑथॉरीटी ऑफ इंडिया ( UIDAI ) तर्फे, आधार कार्ड मधील माहितीमध्ये नाव पत्ता, जन्मतारीख इत्यादी प्रकारच्या कुठल्याही माहितीमध्ये काही चुका असतील तर त्या कशा दुरुस्त करवून घेता येतील याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली गेली आहे. या करीता UIDAI ने आपल्या ऑनलाईन पोर्टल वर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा uidai.gov.in या पोर्टल वर उपलब्ध असणार आहे.

ह्या पोर्टल मार्फत आधार कार्ड धारकांनी आपल्या माहितीमध्ये बदल करण्यासंबंधीचा अर्ज करावयाचा असून, योग्य ती माहिती ही या अर्जाद्वारे कळवायची आहे. ही प्रक्रिया तीन पायऱ्यांमध्ये पूर्ण करायची आहे. पहिल्या पायरीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर ‘ लॉग इन ‘ करायचे आहे, त्यापुढील पायरीमध्ये आपल्याला ज्या माहितीमध्ये बदल करून घ्यावयाचा असेल, त्या माहितीशी निगडीत योग्य ती कागदपत्रे ‘अपलोड’ करायची आहेत, व त्यानंतर बीपीओ सर्व्हिस प्रोव्हायडर चे चयन करवयाचे आहे. या सर्व प्रक्रियेकरिता आधार कार्ड बनवितेवेळी दिलेला रजीस्टर्ड मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. ह्याच मोबाईल नंबर वर आपला ‘ओटीपी’ ( वन टाईम पासवर्ड ) पाठविण्यात येईल.

आपली कागदपत्रे अपलोड करताना ओरिजिनल कागदपत्रे ‘ स्कॅन ‘ करून अपलोड करावीत, अन्यथा आपला अर्ज मंजूर होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आधार कार्ड धारकांच्या सुविधेकरिता, त्यांनी दिलेला अर्ज मंजूर होऊन, आधार कार्डमध्ये आवश्यक ते बदल होण्यास साधारण किती अवधी लागेल, याची ही माहिती आधार कार्ड धारकांना ऑनलाईन अर्ज जमा केल्यानंतर लगेचच दिली जाईल. अर्ज जमा झाल्यानंतर कार्ड धारकांना ‘ अपडेट रिक्वेस्ट नंबर ‘ दिला जाईल. या नंबरच्या आधारे आपले आधार कार्ड चे काम कुठवर पोहोचले आहे ही माहिती कार्ड धारकांना ऑनलाईन ‘ ट्रॅक ‘ करता येईल.

आधार कार्ड वरील माहितीमध्ये बदल करून घेण्यासाठी पासपोर्ट, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, पोस्ट ऑफिस अकाऊंट किंवा पासबुक, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलीफोन बिल या कागदपत्रांपैकी कुठलीही कागदपत्रे चालू शकतील. या कागदपत्रांच्या ओरिजिनल कॉपीज स्कॅन करून अपलोड करावयाच्या आहेत. वीज बिल किंवा फोन बिल तीन महिन्यांपेक्षा अधिक जुने नसावे. या शिवाय इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध आहे.

Leave a Comment