ही बेबी प्रोडक्ट्स तुमच्यासाठीही उपयुक्त


खास तान्ह्या मुलांकरिता जी उत्पादने तयार केली जातात, त्यांच्या पैकी काही उत्पादने आपल्यालाही वापरण्यास चांगली असतात. ही बहुतांशी उत्पादने त्वचेला अपाय पोहोचविणाऱ्या रसायनांशिवाय बनविली जात असून, आपल्या त्वचेची आणि केसांची निगा राखण्यासाठी उपयुक्त असतात. यातील काही उत्पादनांचा वापर आपण आपल्या प्रसाधनासाठी दररोज करु शकतो.

बेबी पावडर आपण केवळ आपल्या त्वचे करिताच नाही, तर आपल्या केसांकरिता ही वापरू शकता. जर केस तेलकट दिसत असतील, तर त्यावर थोडीशी बेबी पावडर भुरभुरावी आणि मग केसांमधून कंगवा फिरवत अतिरिक्त पावडर झटकून टाकावी. पावडरमुळे केसांमधील अतिरिक्त तेल शोषले जाऊन केस तेलकट न दिसता, मुलायम आणि चमकदार दिसतील. त्याचप्रमाणे बेबी ऑईल चा वापर एक उत्तम मॉईश्चरायझर म्हणून करता येईल. बेबी ऑईल च्या मदतीने चेहऱ्यावरील मेकअप सहज पुसून काढता येतो. तसेच याच्या वापरामुळे त्वचा मुलायम आणि आर्द्र राहण्यास मदत होते.

पुष्कळदा घराबाहेर असताना अतिशय घाम आल्यामुळे किंवा खूप धूळ असलेल्या ठिकाणी गेल्यानंतर चेहरा धुवावासा वाटतो. अश्या वेळी तिथे पाणी, साबण, चेहरा पुसण्यासाठी साफ टॉवेल या सर्व वस्तू उपलब्ध असतीलच असे नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना आपल्या सोबत नेहमी बेबी वाईप्स नेण्याची सवय ठेवावी. या मध्ये कोणत्याही प्रकारची अपायकारक रसायने नसून, त्वचा हळुवार साफ करणारी आणि त्वचेला आर्द्रता देणारी तत्वे आहेत. या वाईप्सच्या मदतीने मेकअप साफ करणेही सोपे जाते.

तान्ह्या मुलांना जे डायपर्स घातले जातात, त्यामध्ये राहणाऱ्या ओलाव्याने त्यांना रॅशेस होऊ शकतात, म्हणजेच त्वचेवर बारीक पुरळ येणे, त्वचा लाल होऊन आग होणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. ह्या तक्रारींवर उपाय म्हणून अनेक चांगल्या प्रतीची बेबी अँटी रॅश क्रीम्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या क्रीम्स चा वापर मोठे लोकही, उन्हाळ्यामध्ये घामामुळे येणाऱ्या पुरळासाठी किंवा घामोळ्यांसाठी करू शकतात. बेबी शॅम्पू केसांची हळुवार सफाई करण्याच्या कामी येऊ शकतो. ज्यांना बाजारातील इतर शॅम्पूंची अॅलर्जी असते, ती बहुतेक वेळा त्या शॅम्पूमध्ये वापरल्या गेलेल्या रसायनांमुळे उद्भवते. बेबी शॅम्पू हे खास तान्ह्या मुलांसाठी तयार केले जात असल्याने त्यामध्ये कोणत्याही अपायकारक रसायनांचा वापर केला जात नाही. त्यामुळे केसांच्या निगेकारिता बेबी शॅम्पू चा वापर करणे हा एक चांगला पर्याय आहे.

Leave a Comment