टी-शर्ट परिधान करण्यापूर्वी….


परिधान करायला सोपा, स्टाईलिश, आरामशीर ही सर्व वैशिष्ट्ये टीशर्टमध्ये असल्यामुळे बहुतांश पुरुषांना टीशर्ट परिधान करायला आवडतो. मात्र टीशर्ट घालण्यापूर्वी काही गोष्टी पारखून घ्या. माप, रंग, कापडाचा प्रकार, स्टाईल आणि समारंभ कोणता या पाच निकषांवर टीशर्टची निवड केल्यास ती योग्य ठरेल. टीशर्ट योग्य मापाचा, शोभणाऱ्या रंगाचा, चांगल्या कापडाचा आहे ना याचा विचार केला पाहिजे.

खोल गळ्याचा टीशर्ट – व्ही आकारातील गळा असलेले टीशर्ट सध्या मालिकांमधील अभिनेते घालताना दिसतात. पण रोजच्या आयुष्यात असे टीशर्ट घालताना आपली शारिरीक ठेवण यांच्यावर लक्ष ठेवा. सार्वजनिक ठिकाणी जाताना मात्र असे टीशर्ट घालू नका. शारिरीक ठेवण आकर्षक असली तरी प्रसंगानुसार निवड योग्य ठरते.

स्लोगन टीशर्ट – हल्ली टीशर्ट वरही काही ना काही मेसेज लिहिलेले असतात. दिसायला असे टीशर्ट छान दिसले तरीही नेमक्‍या काय ओळी लिहिल्या आहेत त्याचा अर्थ जरूर समजून घ्या. मगच अशा प्रकारचे टीशर्ट घ्यायचे की नाही विचार करा. नाहीतर फॅशनला बळी पडून घोषवाक्‍य लिहिलेले शर्ट घेऊन लोकांसाठी चेष्टेचा विषय होऊ नका

फिटिंग – योग्य मापातील टीशर्ट हे खूप महत्त्वाचा भाग आहे. अगदी सिक्‍स पॅक ऍब्ज असतील तरीही अतितंग किंवा फिटींगचे टीशर्ट वापरण्यापासून थोडे लांबच रहावे. बॉडी फिट टीशर्ट अनेकदा शरीराला चिटकून बसतात. पण बरेचदा ते शोभून दिसत नाहीत. खूप बारीक किंवा खूप जाड असाल तरीही अति ढिले टीशर्ट घालू नयेत. कारण त्यात तुम्ही कार्टून दिसू शकता.

टीशर्ट कॉम्बिनेशन – टीशर्ट हे कॅज्युअल वेअर आहे. त्यामुळे ऑफिशिअल कार्यक्रम, बैठका इथे टीशर्ट घालून जाणे टाळा. सूटची पॅंट टी-शर्टबरोबर घालू नका. सर्वसाधारणपणे टीशर्टवर जीन्सच चांगली दिसते. फॉर्मल शूज, स्टाईलिश रिस्ट वॉच, ऑफिस बॅग्ज आणि एक्‍झिक्‍युटिव्ह सनग्लासेसही टीशर्ट वर घालू नयेत. थोडक्‍यात टी-शर्ट केव्हा आणि कुठे घालावे याबाबतचे काही संकेत आहेत त्याचे पालन केल्यास आपले हसे होण्याची शक्‍यता कमी आहे.

Leave a Comment