टी बॅग्सचा असा ही उपयोग


आपल्या आवडत्या चहाची टी बॅग कपभर गरम पाण्यामध्ये घातली की चहा झटपट तयार होतो. प्रवासामध्ये हवा त्या वेळेला चहा पिण्यासाठी टी बॅग्स बरोबर नेणे हा उत्तम पर्याय आहे. पण ह्याच टी बॅगचे इतरही अनेक फायदे आहेत. टी बॅग ओली करून चेहऱ्यावर फिरविल्यास त्वचेवरची रंध्रे मोकळी होतात, व त्वचा नितळ आणि उजळ दिसू लागते. त्याशिवाय टी बॅग पाण्यामध्ये उकळून घेऊन त्या पाण्याने केस धुतल्यास केसांचे उत्तम प्रकारे कंडीशनिंग होते. या मध्ये अँटी ऑक्सिडंट्स मुबलक मात्रेमध्ये असून, त्वचेमधील पेशींचे आरोग्य सुधारण्याचे काम टी बॅग्स करतात. तसेच डोळ्यांना थकवा वाटत असेल, डोळ्यांखाली सूज रहात असेल, किंवा डोळे लाल होत असतील, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतील, तर ओल्या टी बॅग्स डोळ्यांवर ठेवल्याने आराम मिळेल. टी बॅग्स च्या या उपयोगांव्यतिरिक्त अजून अनेक प्रकारे टी बॅग्स उपयुक्त ठरू शकतात.

काही तरी लागल्याने कधी अंगावर काळे निळे वण उमटतात, किंवा रक्त साकळते. अश्या वणांवर टी बॅग ओली करून लावल्याने हे वण बरे होण्यास मदत मिळते. चहामध्ये असलेल्या टॅनिन या द्रवाने त्वचेच्या आतमध्ये होणारा रक्तस्राव थांबून त्वचेचा रंग पूर्ववत होऊन वण नाहीसे होतात. जर कडक उन्हामध्ये खूप काळ राहिल्याने त्वचेवर लालसर चट्टे उठले असतील, तर त्यावरही ओली टी बॅग ठेवावी. तसेच कुठला किडा किंवा मुंगी चावल्याने अंगावर फोड येऊन खाज सुटत असेल, तर त्यावरही ओली टी बॅग लावून ठेवावी. त्याने खाज कमी होऊन फोड लवकर नाहीसा होतो.

जर त्वचेवर मस किंवा चामखीळ असेल, तर त्यावर गरम पाण्यातून बुडवून काढलेली टी बॅग मस किंवा चामखीळ सुकून जाईपर्यंत दररोज काही वेळाकरिता ठेवावी. चहामध्ये असलेल्या टॅनिनमध्ये अँटी बॅक्टेरियल तत्वे असून त्यामुळे मस वा चामखीळ सुकून नाहीसा होण्यास मदत होते. तसेच हिरड्यांना सूज येऊन त्यांतून रक्तस्राव होत असेल तर एक नुकतीच वापरलेली टी बॅग फ्रीजमध्ये ठेऊन थंड करावी, व हिरड्यांमधून जिथे रक्तस्राव होत असेल, तिथे काही वेळ ठेवावी. या उपायाने रक्तस्राव बंद होऊन हिरड्यांची सूज ही कमी होईल.

Leave a Comment