‘सोलर सुरेश’ यांची स्वयंसिद्ध वास्तू


चेन्नई मधील किलपौक या ठिकाणी राहणाऱ्या डॉक्टर सुरेश यांचे घर सर्व सुखसोयींनी परिपूर्ण आहे, पण या सर्व सुविधा पर्यावरणाचे जतन करण्याच्या दृष्टीने केल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर सुरेश यांचे घर संपूर्णतया सौर उर्जेवर चालत असून, या घरामध्ये एक बायोगॅस युनिट आहे. तसेच रेन वॉटर हार्व्हेस्टिंग आणि भरपूर भाजीपाला पिकविणारी बाग अशा सर्व सोयींनी युक्त असे डॉक्टर सुरेश यांचे घर आहे. त्यांना त्यांच्या मित्रजन व परिवारजनांनी, त्यांच्या पर्यावरणाचे जतन करीत पाणी व वीज मिळविण्यासाठी नैसर्गिक स्रोतांचा वापर करण्याच्या कल्पनेचे कौतुक म्हणून’ सोलर सुरेश’ असे नाव दिले आहे.

डॉक्टर सुरेश यांनी आय आय टी मद्रास आणि आय आय एम अहमदाबाद येथून उच्च शिक्षण घेतले असून, अनेक टेक्स्टाईल कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. सध्या ते एका कंपनीमध्ये जनरल मॅनेजर असून, त्यांच्या दिवसाची सुरुवात बायोगॅसचा वापर करून चालविलेल्या शेगडीवर बनविलेल्या कॉफीने होते. त्यांच्या खोलीतील पंखे सौर उर्जेवर चालतात. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये घरच्या बागेत पिकविलेल्या ताज्या भाज्या असतात. घरामध्ये सौर उर्जेचा वापर करण्याची कल्पना त्यांच्या मनामध्ये कशी काय आली असे विचारले असता, आपण जर्मनीला गेलो असताना तेथील लोकांच्या घरांवर सौर उर्जा यंत्रणा पाहून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. जर्मनीसारख्या देशामध्ये वर्षाचे काही महिने तर सूर्यप्रकाश अगदी कमी असूनही ते लोक सौर उर्जा वापरू शकतात, तर मग भारतामध्ये, विशेषतः चेन्नई सारख्या ठिकाणी सूर्यप्रकाश भरपूर असताना सौर उर्जा नक्कीच वापरली जाऊ शकते, या विचाराने डॉक्टर सुरेश प्रेरित झाले.

जेव्हा डॉक्टर सुरेश भारतामध्ये परतले, तेव्हा त्यांनी आपल्या घरासाठी सौर उर्जा वापरण्याचे ठरविले. सुरवातीला सौर उर्जा यंत्रणा लावण्यासाठी त्यांनी अनेक मोठ्या कंपन्यांशी संपर्क केला. पण इतक्या लहान प्रकल्पामध्ये त्या कंपन्यांना रस वाटेना. त्यामुळे एका स्थानिक व्यावसायिकाची मदत घेण्याचे सुरेश यांनी ठरविले. त्या व्यावसायिकानेही सुरेश यांच्या कल्पनेत रस घेऊन प्रायोगिक पातळीवर एक किलोवॅट सौर उर्जा निर्माण करणारे पॉवर प्लँट सुरु केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सुरेश यांनी आता तीन किलोवॅट सौर उर्जा निर्माण करणारा पॉवर प्लँट बसविला आहे. या पॉवर प्लँट द्वारे निर्मित उर्जा घरामध्ये पुरविण्यासाठी कुठल्याही वेगळ्या वायरिंग ची गरज नसून, याच्या इंस्टॉलेशनसाठी एका दिवसाचा अवधी पुरेसा असतो, व सहा महिन्यातून एकदा सोलर पॅनल्सची स्वच्छता करावी लागते, असे डॉक्टर सुरेश यांनी सांगितले.

सौर उर्जा सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा वापर करीत निर्माण केली जात असून, सूर्यप्रकाश नसला तरी सौर उर्जा तयार होत राहते. सुरेश यांच्या घरामधील दिव्यांपासून ए सी पर्यंत सर्व विद्युत उपकरणे सौर उर्जेवर चालतात., त्यामुळे “ गेल्या काही वर्षांमध्ये’ पॉवर कट’ कसा असतो हे आम्ही विसरूनच गेलो आहे “, असे डॉक्टर सुरेश गमतीने म्हणतात. आता तामिळनाडू सरकारने सौर उर्जेच्या वापरला प्रोत्साहन देण्यासठी सोलर नेट मीटरिंग सिस्टम सुरु केली आहे. या योजने अंतर्गत राज्यामध्ये सौर उर्जेचा वापर करण्यासाठी एक किलोवॅटचा सोलर प्लँट आपल्या घरामध्ये लावणाऱ्या पहिल्या दहा हजार नागरिकांना राज्य सरकार तर्फे वीस हजार रुपयांची सबसिडी दिली जाणार असून, केंद्रीय सरकारतर्फे ही सौर उर्जा प्लँट लावण्यासाठी तीस हजार रुपयांची सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment