घरच्या घरीच तयार करा ‘रीपेलंट‘


पावसाळा हा अगदी रोमँटिक ऋतू म्हणून सर्वांना आवडत असला, तरी हा ऋतू आपल्यासोबत निरनिराळ्या व्याधी, दमटपणा, रस्त्यातील खड्डे, जिथे तिथे साचलेले पाणी, खोळंबलेली वाहतूक अशा अनेक अडचणी घेऊन येतो. त्याचबरोबर अजून एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे डास, माश्या आणि तत्सम कीटकांच्या वाढत्या प्रादुर्भावाचा. या कीटकांचा नायनाट करण्यासाठी अनेक प्रकारची रीपेलंट्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण या रीपेलंट मध्ये असणारी रसायने आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात. विशेषतः ज्यांना श्वसनासंबंधी आजार आहेत, त्यांच्या साठी तर ही रीपेलंट अतिशय अपायकारक ठरतात. शिवाय घरातील लहान मुलांच्या हाती ही रीपेलंट लागण्याचाही धोका असतोच. कीटकांचा नायनाट करण्यासाठी कुठलेही धोके न पत्करता, घरच्याघरी अतिशय सुरक्षित पद्धतीने, घरात सहज सापडणाऱ्या वस्तू वापरूनही रीपेलंट बनवता येऊ शकतात.

जर घरामध्ये माशांचा प्रादुर्भाव असेल तर एक कप अल्कोहोलमध्ये २ लहान चमचे अॅलो व्हेराचा रस, एक कप निलगिरीचे तेल आणि अर्धा कप आपल्या आवडीच्या सुवासाचे इसेन्शियल ऑईल घालून हे मिश्रण एका स्प्रे बॉटल मध्ये भरावे. ज्या भागामध्ये माशांचा प्रादुर्भाव असेल, त्या भागामध्ये हे मिश्रण स्प्रे करावे. तसेच गवती चहाच्या तेलाचे काही थेंब पाव कप गरम पाण्यामध्ये घालून हा स्प्रे दरवाजे आणि खिडक्यांच्या आजूबाजूला केल्यानेही घरामध्ये माशांचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसेल. तुळशीची पाने किंवा तमालपत्रे वाळवून, त्यांची एका लहान कपड्यात बांधून पुरचुंडी करून, ती दरवाजावर किंवा खिडकीमध्ये लावल्यासही माशा येत नाहीत.

घरामध्ये जर खूप डास झाले असतील, तर चार ते पाच लसणीच्या मोठ्या पाकळ्या एक कप गरम पाण्यामध्ये उकळाव्यात. हे मिश्रण एका स्प्रे बॉटल मध्ये भरून घरामध्ये स्प्रे करावे. यामुळे डासांचा नायनाट होईल. त्याचप्रमाणे विजेवर चालणाऱ्या रीपेलंट ची रिकामी बाटली असल्यास त्यामध्ये कडूनिंबाचे तेल भरून त्यामध्ये चार ते पाच कापराच्या वड्या टाकाव्यात, व नेहमीप्रमाणे रीपेलंट ची बाटली मशीन मध्ये लाऊन वापरावी.

Leave a Comment