नोकरी नाही, म्हणून काय झाले….


कोणत्याही पदवीधर विद्यार्थ्याला नोकरी किंवा रोजगार नसणे हा एकप्रकारचा गुन्हा वाटत असतो. परंतु आता नोकरी नाही म्हणजे जग संपले असे गृहीत धरणे चुकीचे आहे. आजकाल माहिती-तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमुळे घरबसल्या अनेक गोष्टीचे अध्ययन करता येते. आपले नॉलेज अपडेट करण्याची ही एक सुवर्णसंधी मानायला हवी.

स्पर्धात्मक परीक्षा, नवीन अभ्यासक्रमांना प्रवेश, पुस्तक वाचन, पर्यटन यासारख्या गोष्टीतून आपण बेरोजगारीचा काळ मागे टाकायला हवा. फावल्या वेळेचा लाभ घेत नाविण्यपूर्ण अभ्यासक्रमांची निवड करून कौशल्य हस्तगत करण्याचा प्रयत्न करावा.

सर्जनशील व्हा – करियरसाठी क्षेत्र निवडताना ते आवडीचे असेलच हे सांगता येत नाही. याशिवाय तुम्ही बाळगलेला छंद हेच पुढे करियरचे साधन होऊ शकते, याचाही फारसा विचार होत नाही. कारण आपण छंदाकडे टाईमपास किंवा काही वेळ करमणूक म्हणून पाहत असतो. परंतु आपल्याकडे फावला वेळ असेल तर आपण छंद, हौस यात आणखी कौशल्य विकसित केले तर भविष्यात उज्ज्वल करियर होऊ शकते. चित्रकला, लेखन, नृत्य यासारख्या कला आपल्याला अवगत असतील तर त्यात आणखी सुधारणा करण्याचा विचार केला पाहिजे. लिखाणातून आपले विचार आणखी प्रगल्भ होऊ लागतात. वृत्तपत्रातून कॉलम किंवा प्रासंगिक लिखाणास प्रारंभ केल्यास आपल्या करियरला नवीन दिशा मिळू शकते. नृत्यकलेत पारंगत होऊन क्‍लास घेऊन आपण वेळेचा सदपयोग करू शकतो. वादन, गायन यात जर आपल्याला रुची असेल आपण त्यात आणखी कौशल्य मिळवू शकतो.

नेटवर्क – बेरोजगारीच्या काळात किंवा नोकरी मिळण्यास अडचणी येत असतील तर स्वत:ला गुन्हेगार समजणे चुकीचे ठरेल. स्वत:ला खोलीत कोंडून ठेवू नका किंवा एकटेपणातच वेळ घालवू नका. यामुळे आपल्या कार्यक्षमतेवर, विचारांवर, उत्साहावर विरजन पडते आणि एकलकोंडेपणा वाढू शकतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न करा. आपले मन मोकळे करा. करियरबाबत मार्गदर्शन किंवा सल्ला घ्या. यामधूनच एखादी संधी आपल्याला मिळू शकते. दार बंद केल्याने हातची संधी गमावण्याची शक्‍यता असते. याउलट अधिकाधिक लोकांना भेटल्याने संधी तुमचे दार कधी ठोठावेल, हे सांगता येत नाही. सोशल मिडिया किंवा नियमित भेटीतून मित्रांशी कायम संवाद साधण्याचा प्रयत्न करा. यातून विचारांची देवाणघेवाण होईलच त्याचबरोबर करियरबाबत नवीन दिशाही मिळू शकते.

प्रवास – नोकरी नसलेल्या काळात आपण प्रवासाचा निश्‍चित विचार करायला हवा. नवीन शहर, नवीन लोक, जीवनशैली, नवीन संस्कृती, नवीन आहार संस्कृती, विचार यातून करियरला दिशा मिळू शकते. जर एखाद्या विद्यार्थ्याला पर्यटनाची हौस असेल तर तो पर्यटन क्षेत्रात करियर करू शकतो. पर्यटनविषयक अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात पूर्णवेळ काम करू शकतो. उत्तम संवादशैली आणि स्थानिक माहितीच्या आधारावर पर्यटनक्षेत्राची निवड करता येते. याशिवाय देश-परदेशाची सैर केल्याने विविध क्षेत्रात होणारे बदल कळू लागतात. महाविद्यालयातून शिकावयास मिळत नाही ते अनौपचारिक शिक्षण फिरण्यातून, प्रवासातून, लोकांशी संवाद साधल्याने मिळते.

परकी भाषा शिका – नोकरी नसतानाच्या काळात आवडीच्या क्षेत्रातील कोर्स करण्याचा विचार करावा. तसेच परकी भाषा शिकण्याचाही प्रयत्न करावा. जर्मन, फ्रेंच, जपानी भाषा शिकल्यास केवळ वेळेचा सदुपयोग होणार नाही तर आपल्याला रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणारी बाब ठरू शकते.

Leave a Comment