फरशी करा चकाचक


दिवाळीची लगबग सुरू झाली की सर्वप्रथम काम येते ते गृहस्वच्छतेचे. स्वच्छतेनंतर सजावटीच्या कामाची सुरुवात होते. घराच्या सजावटीसाठी खूप छान फर्निचर, गालिचे अंथरले असतील आणि फऱशी खराब असेल, तिचा रंग फिकट झाला असेल तर एकूण सौंदर्याला बाधा येते. फक्त घर छान दिसावे म्हणून नव्हे तर आजारपण येऊ नयेत म्हणूनही फरशी स्वच्छ असणे आवश्‍यक आहे. नियमित स्वच्छता न झाल्यास फरशीचा रंग बदलतो. तसेच अनेक जीवजंतु राहिल्याने घरात आजारपणे येण्याची शक्‍यता असते. घरातील फरशी स्वच्छ आणि चकचकीत रहावी यासाठी काही उपाय करता येतात.

व्हिनेगर – काळ्या आणि लाल रंगाच्या टाईल्स या इतर कोणत्याही रंगाच्या टाईल्सच्या तुलनेत लवकर खराब होतात. त्या स्वच्छ करण्यासाठी एक बादली पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळून ते मिश्रण वापरावे.

लिंबाचा वापर – घरी पाहुणे यायचे असतील आणि लवकर फरशी स्वच्छ करायची असेल तर एकदम उत्तम उपाय म्हणजे लिंबू कापून त्याचा रस एक बादली पाण्यात घाला. त्याने फरशी स्वच्छ करावी. त्यामुळे जमीनीवर पडलेले डाग स्वच्छ होण्यास मदत होते.

अमोनिया – एक बादली पाण्यात एक कप अमोनिया मिसळून फरशी स्वच्छ पुसून घ्या. अमोनियाचा वास तीव्र असतो त्यामुळे फरशी पुसून झाल्यावर दरवाजे, खिडक्‍या उघड्या ठेवा. त्यामुळे वास बाहेर निघून जाईल.

फरशी सील- हल्ली बाजारात फरशी सील करण्यासाठी एक प्रकारचे प्लास्टिक मॅट मिळते. संपूर्ण फरशीवर ते टाकता येईल. त्याची साफसफाईही सोपी असते.

इथेनॉलचा वापर – फरशीची स्वच्छता करण्यासाठी इथेनॉलचाही वापर केला जातो. एक बादली पाण्यात एक चमचा इथेनॉल मिसळून त्याने फरशी पुसावी. त्यामुळे फरशीवरील डाग पुसले जातात.

गरम पाणी आणि साबण – घरामध्ये ब्लॅक मार्बलचा वापर केला असेल तर आम्लधर्मी कोणतीही पावडर, लिक्‍विड यांचा वापर करू नका. त्यामुळे फरशी स्वच्छ होण्याऐवजी खराब होण्याचीच शक्‍यता असते. त्याऐवजी कोमट पाण्यात साबण टाकून फरशी पुसल्यास ती स्वच्छ होते आणि चमकही येते.

Leave a Comment