पांढरे केस काळे करण्याकरिता घरच्याघरी बनवा हेअर डाय


आजकाल बाजारामध्ये निरनिराळ्या ब्रँड्सचे हेअर डाय उपलब्ध आहेत. पण या हेअर डाय मधील रसायनांमुळे केसांना आणि त्वचेला देखील अपाय होऊ शकतो. आपले पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर डाय घरच्याघरी देखील तयार करता येऊ शकतो. या हेअर डाय मध्ये वापरण्याच्या सर्व वस्तू प्राकृतिक असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर नाही. त्यामुळे हे हेअर डाय वापरण्यास अगदी निर्धोक आहेत.

हेअर डाय म्हणून सर्वात जास्त जो पर्याय निवडला जातो, तो म्हणजे मेहंदी, किंवा हीना. मेहंदी मुळे पांढरे केस तर डाय होतातच, त्याशिवाय केस अतिशय मुलायम आणि चमकदारही बनतात. मेहंदीची पूड अर्धा कप एरंडेल तेलात मिसळून हे तेल चांगले उकळून घ्यावे. उकळल्यानंतर ह्या तेलाला मेहंदीचा रंग चढतो. तेल थंड झाल्यानंतर केसांना लावून दोन तास ठेवावे. त्यांनतर एखाद्या सौम्य शॅम्पूने किंवा शिकेकाई वापरून केस धुवून टाकावेत.

कॉफी वापरूनही केसांना डाय करता येऊ शकतो. एक कप पाण्यामध्ये कॉफी पावडर घालून पाणी उकळून घ्यावे. साधारण पांच मिनिटे हे मिश्रण उकळू द्यावे, थंड झाल्यानंतर हे मिश्रण एका स्प्रे बॉटल मध्ये भरून आपल्या केसांवर स्प्रे करावे. केसांवर आणि केसांच्या मुळांपर्यंत हे मिश्रण स्प्रे करीत केसांमध्ये हळुवार मसाज करावा. हे मिश्रण केसांमध्ये एक तास ठेऊन त्यानंतर केस धुवून टाकावेत. कॉफी प्रमाणेच काळा चहा सुधा हेअर डाय म्हणून वापरता येतो.

अक्रोडाच्या सालीपासूनही गडद ब्राऊन रंगाचा डाय तयार करता येतो. पण हा डाय वापरताना काळजी घ्यावी कारण कपड्यांवर किंवा त्वचेवर पडलेले याचे डाग सहज निघत नाहीत. अक्रोडांची साल बारीक कुटून घेऊन पाण्यामध्ये घालून अर्धा तास उकळावी. मिश्रण थंड झाल्यानंतर केसाच्या मुळांपासून टोकापर्यंत कापसाच्या बोळ्याने व्यवस्थित चोळून लावावे. तासभर हे मिश्रण केसांमध्ये राहू देऊन त्यानंतर केस धुवून टाकवेत.

Leave a Comment