जपानी लोक शतायुषी कसे या रहस्याचा उलगडा


जपानमधील ओकिनावा बेटावरील बहुतेक नागरिक शतायुषी आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यामागे नक्की काय रहस्य आहे हे शोधण्याकरिता कित्येक वैज्ञानिकांनी या लोकांच्या जीवनशैलीचा अगदी खोलात शिरून अभ्यास केला. अखेरीस वैज्ञानिकांना या रहस्याचा उलगडा झाला आहे. गेली अनेक शतके ओकिनावाचे रहिवासी ‘ हारा हाची बु ‘ या तत्वाचे पालन करीत आहेत. या शब्दांचा अर्थ असा, की पोट शंभर टक्के भरेल इतके न जेवता, पोट केवळ ऐंशी टक्के भरेल इतकेच जेवावे. म्हणजेच, जेवण झाल्यानंतरही पोट वीस टक्के रिकामे असायला हवे. या तत्वाचे काटेकोरपणे पालन करणारे ओकिनावाचे रहिवासी शतायुषी ठरले आहेत.

जपानी संस्कृतीमध्ये ‘ हारा हाची बु ‘ हे तत्व फार प्राचीन काळापासून चालत आले आहे. जर शंभर टक्के पोट भरेपर्यंत जेवण केले गेले, तर इतक्या जास्त प्रमाणात सेवन केलेल्या अन्नाचे पचनही अगदी सावकाशीनेच होते. त्यामुळे शरीरामधील पेशींचे ज्वलन होण्यास सुरुवात होते. पेशींच्या ज्वलनप्रक्रियेमुळे शरीर लवकर थकते, म्हातारे होते. ओकिनावा मधील रहिवाश्यांचा आहार पाहता, ते लोक दिवसाला १८०० ते १९०० कॅलरीज मिळतील एवढाच आहार घेतात. पोट शंभर टक्के न भरता केवळ ऐंशी टक्केच भरू द्यायचे या तत्वामुळे त्यांचा आहार आपोआपच नियंत्रित असतो.

पोट जेव्हा गच्च न भरता थोडेसे रिकामे राहते, तेव्हा अन्नपचन लवकर होते. पोटामध्ये अन्नाचे विघटन ही लवकर होते. त्यामुळे अपचन, गॅसेस, मेटाबोलिझम शी निगडीत तक्रारी उद्भवत नाहीत. वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार ‘ हारा हाची बु ‘ या तत्वाचे पालन करणाऱ्या ओकिनावाच्या रहिवाश्यांची रक्त तपासणी केली असता, त्यांच्या रक्तामध्ये फ्री रॅडीकल्स अतिशय कमी प्रमाणात सापडले. म्हणूनच या लोकांमध्ये कॅन्सर, हृदयरोग, आणि म्हतारपणाशी निगडीत इतर आजारही फार क्वचित होताना आढळतात.

‘ हार हाची बु ‘ या तत्वाचे पालन करण्यासाठी दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे खाण्याची सवय ठेवावी. तसेच खूप भूक लागेपर्यंत वाट बघणे टाळावे, कारण अश्या वेळेला जे समोर येईल ते खाल्ले जाते, व त्याचा त्रास अपचनाच्या रूपाने नंतर जाणवतो. त्यामुळे जेवणाच्या नियमित वेळा असाव्यात. जेवताना घाई गडबड न करता, प्रत्येक घास सावकाश चावून खावा. घाई घाईत जेवण उरकल्यास अन्न व्यवस्थित पचत नाही. आपल्या जेवणामध्ये ताज्या भाज्या आणि फळे यांचा समावेश करावा. फळे आणि भाज्यांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने तुमची त्वचा आणि एकंदर आरोग्य चांगले राहील व तुम्ही दीर्घ काळ तरुण दिसाल.

Leave a Comment