घरातील झाडांसाठी एप्सम सॉल्टचे फायदे


जैविक खत म्हणून एप्सम सॉल्टचा उपयोग करणे हा एक चांगला पर्याय आहे. आपण ज्या मातीमध्ये रोपे लावलेली असतील, त्या मातीमध्ये जर मॅग्नेशियम किंवा सल्फर ची कमी असेल, तर त्याकरिता एप्सम सॉल्ट वापरणे फायद्याचे ठरते. मातीमध्ये सल्फर किंवा मॅग्नेशियमची कमी रासायनिक परीक्षणाद्वारे माहिती करून घेता येते. घरातील कुंड्यांमध्ये झाडे लावलेली असतील, तर त्यांच्यासाठी एप्सम सॉल्टचा वापर करावा. एक लिटर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे एप्सम सॉल्ट मिसळून हे पाणी महिन्यातून एकदा झाडांना घालावे. एरवी आपण घालत असलेल्या पाण्यामधील क्षार झाडांच्या मुळांशी एकत्र होऊन, झाडाची वाढ रोखू शकतात. एप्सम सॉल्ट मिसळलेल्या पाण्याचा वापर केल्याने झाडांच्या मुळांशी जमलेले हे क्षार दूर होऊन झाडांची योग्य प्रमाणात वाढ होते.

नव्याने एखादे रोप जर कुंडीमध्ये लावले असेल, तर सुरुवातीलाच त्यामध्ये एप्सम सॉल्ट घालणे चांगले. असे केल्याने ते रोप मातीमधील पोषक द्रव्ये जास्त प्रभावी रीतीने शोषून घेऊ शकते. जर आपण आपल्या झाडांसाठी एप्सम सॉल्ट वापरणार असाल, तर त्या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. जर काही झाडे सावलीतच लावण्याची असली, तर त्यांना एप्सम सॉल्टचा वापर करतानाही सावलीतच राहू द्यावे. भाज्या लावल्या असतील, तर त्यांच्यासाठीही एप्सम सॉल्ट खत म्हणून वापरल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. विशेषतः फ्लॅट्स मध्ये रहाणाऱ्या लोकांकडे बागकामासाठी जागेचा अभाव असतो. पण एप्सम सॉल्ट वापरल्याने अगदी कमी जागेतही, कुंड्यांमध्ये भरपूर भाज्या पिकविता येऊ शकतात.

Leave a Comment