अॅपल प्रमुख टीम कूक यांच्या पगारात कपात


नवी दिल्ली – २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अॅपलच्या विविध उत्पादनांच्या विक्रीमध्ये घट झाल्यामुळे कंपनीचे प्रमुख टीम कुक यांच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. टीम कूक यांना २०१९ साली एक कोटी १६ लाख डॉलर एवढे वार्षिक वेतन मिळाले. त्यांना २०१८ मध्ये एक कोटी ५७ लाख डॉलर एवढे वार्षिक उत्पन्न मिळाले होते. टीम कुक यांना ३० लाख डॉलर एवढे मूळ वेतन दिले जाते. इतर भत्ते आणि बोनस यांचा त्यावर समावेश असतो. इतर भत्ते आणि बोनस कंपनीच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असतो.

त्या वर्षात अॅपलच्या विविध उत्पादनांची विक्री कशी झाली, कंपनीकडून यावर दिले जाणारे विविध भत्ते आणि बोनस अवलंबून असतात. कंपनीच्या उत्पादनांची अपेक्षित विक्री न झाल्यामुळे त्यांच्या एकूण वेतनात कपात झाली आहे. टीम कुक यांना २०१९ मध्ये ७७ लाख डॉलर एवढ्या रकमेचे भत्ते आणि बोनस देण्यात आले. टीम कुक यांना २०१८ मध्ये एक कोटी २० लाख डॉलर एवढ्या रकमेचे भत्ते आणि बोनस मिळाले होते. त्यामुळेच २०१९ मध्ये त्यांच्या एकूण वेतनात एवढा मोठा फरक पडला आहे.

२०१९ मध्ये कंपनीकडून टीम कुक यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या प्रवासासाठी वापरण्यात आलेल्या खासगी विमानासाठी ८८५००० डॉलर खर्च करण्यात आले आहेत. टीम कुक यांच्या खासगी आणि कंपनीशीसंबंधित सर्व प्रकारच्या प्रवासासाठी त्यांना खासगी विमान दिले जाते. आयफोनच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षात घट झाल्याने आता अॅपल कंपनी इतर माध्यमातून आपला महसूल वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. डिजिटल मजकूर इतर सेवांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जातो आहे.

Leave a Comment