हा आहे ऐशोआरामी राहणी पसंत असलेला कोरियन हल्क


हिरव्या बलदंड शरीराचा आणि अचाट कामे चुटकीसरशी करू शकणारा सुपर हिरो हल्क अनेकांचा आवडता हिरो असेल. अर्थात प्रत्यक्षात हल्क सारखी बॉडी असणे तसे अवघडच असे वाटत असेल तर कोरियाचा जे योंग हा त्याचे उत्तर आहे. प्रोफेशनल वेटलिफ्टर आणि आर्म रेसलर जे योंगला त्याच्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणे फार आवडते आणि त्याच्या इन्स्टाग्राम अकौंटवर तो त्या संदर्भातले फोटो वेळोवेळी शेअर करत असतो.

जे योंगची उंची बेतासबात म्हणजे ५ फुट ४ इंच आहे आणि वजन आहे ११० किलो. त्याचे बायसेप्स ५६ सेंटीमीटरचे असून तो रशियात, दुबई आणि कोरिया अश्या तिन्ही ठिकाणी राहतो. गेल्या काही दिवसात तो चर्चेत आला ते त्याच्या हॉलीवूड अभिनेत्री लिंडसे लोहान बरोबरच्या मैत्रीने. लिंडसेला अनेकदा योंगच्या खासगी जेट मध्ये पहिले गेले मात्र आमची केवळ मैत्री आहे असा खुलासा त्यांनी केला.

सोशल मिडियावर योंग अनेकदा त्याचे खासगी जेट, दागिने, कपडे, हिरे याचे फोटो टाकतो. गेली १२ वर्षे तो आर्म रेसलिंग करतो आहे. तो यात नॅशनल चँपियन आहे आणि त्याला वर्ल्ड चँपियन बनायचे आहे. २७० किलोसह बेंच प्रेस, ३४० किलो सह डेड लिफ्ट व ३२०किलो सह स्क्वाटस असे त्याचे राष्ट्रीय रेकॉर्ड आहे. तो खूप व्यायाम करतो आणि त्याचबरोबर पिझ्झा, हॅमबर्गर, नुडल्स असल्या जंक फूडचा मनसोक्त आस्वाद घेतो. त्याला फरचे कोट्स फार आवडतात आणि त्याच्याकडे असे महागडे ५० कोट आहेत.

योंग उद्योगपती आहे. तो नाईट क्लब चालवितो आणि जगातील सर्वात लग्झरी आणि महागडे रेस्टोरंट उघडण्याची त्याची इच्छा आहे. अनेक प्रकारची महागडी घड्याळे, ज्युवेलरी तो खरेदी करतो त्यासाठी लिलावात सहभागी होतो. त्याचा एक कुत्रा आहे, कोकेशियन जातीचा हा कुत्रा आकाराने महाप्रचंड आहे. त्याला रोज ९ चिकनचा आहार दिला जातो. या कुत्र्याचे वजन आहे १०३ किलो.

Leave a Comment