बगदाद विमानतळावर अमेरिकेचा एरिअल स्ट्राईक


बगदाद -गुरुवारी रात्री अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या एरिअल स्ट्राईकमध्ये इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले आहेत. बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने कासिम सुलेमानी यांचा ताफा जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. आठ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहदी अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती आहे. या वृत्ताला इराकच्या सरकारी वृत्तवाहिनीने, कासिम सुलेमानी ठार झाल्याच्या दुजोरा दिला आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास बगदाद आंततराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला असून आठ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचाही यामध्ये समावेश असल्याचे इराक लष्कराकडून जाहीर करण्यात आले आहे. इस्त्राइलवर रॉकेट हल्ला केल्याचा आरोप सुलेमानी यांच्यावर होता. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका त्यांच्या शोधात होती.

अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन लष्कराने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर इराणचे टॉप कमांडर मेजर कासेम सुलेमानी यांना ठार केले आहे. विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी कासेम सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट केला. या ट्विटमध्ये काहीही लिहिण्यात आलेले नसून फक्त राष्ट्रध्वज दिसत आहे. या ट्विटच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्ष संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment