नागरिकत्व कायद्यावरून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – अमित शहा


जोधपूर – देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलने सुरू असताना हा कायदा केंद्र सरकार मागे घेणार असल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. शुक्रवारी शहा यांनी राजस्थानमध्ये बोलताना नागरिकत्व कायद्यावरून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. या कायद्याला अनेक आंदोलनांमध्ये देशातील मुस्लिमांच्या विरोधी असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, या कायद्याचा देशातील मुस्लिमांशी काहीच संबंध नाही. तसेच यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुद्दाम गैरसमज आणि अफवा पसरवण्याचे काम करत आहेत असा आरोप अमित शहा यांनी केला.

अमित शहा यांनी जोधपूर येथील सभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले आहे. त्यांनी नागरिकत्व कायद्यावर चर्चा करण्यासाठी कुठेही या असे सांगितले आहे. शहा राहुल गांधींना आव्हान देताना म्हणाले, राहुल बाबा कायद्याचा अभ्यास केला असेल तर कुठेही चर्चा करण्यासाठी या. कायदाच वाचला नसेल तर मी त्याचे इटालियन भाषांतर पाठवतो. ते वाचून घ्या. एवढ्यातच अमित शहा थांबले नाहीत. काँग्रेसवर या कायद्यावर अफवा पसरवण्याचे त्यांनी आरोप केले आहेत. काँग्रेसच काय, देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन विरोध केला, तरीही भाजप सरकार नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून एक इंचही माघार घेणार नसल्याचे वक्तव्य शहा यांनी केले.

Leave a Comment