कामगार संघटनांच्या ८ जानेवारीच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा पाठींबा


मुंबई: कामगार संघटनांनी ८ जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ पुकारलेल्या देशव्यापी संपात शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने देखील पाठींबा दिला आहे. या संपात शिवसेना व भारतीय कामगार सेना सक्रियपणे सहभागी होणार असल्यामुळे संपाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

देशभरातील कामगार संघटनांच्या दिल्लीत ३० सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या अधिवेशनात या संपाची हाक देण्यात आली होती. राज्यात या संपाची तयारी व नियोजन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सुरू होते. या कृती समितीचा शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनादेखील घटक आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या संपात शिवसेना आणि भारतीय कामगार सेना सक्रिय सहभाग नोंदवणार आहे.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थितही उपस्थित होते. संजय राऊत यावेळी म्हणाले की, आम्ही देशभरातील कामगारांच्या न्याय हक्कांसाठी सोबत आहोत. देशात उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहे. शिवसेना कामगारांच्या पाठिशी असून हा संप यशस्वी ठरेल असेही त्यांनी म्हटले.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्षांनी कामगारांच्या देशव्यापी संपाला पाठिंबा दिला आहे. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटना, बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, संरक्षण, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएसएनएल, एमटीएनएल, टॅक्सी, रिक्षा, एसटी, बेस्ट, मालवाहतूकदार, अंगणवाडी, आशा वर्कर्स, घरकामगार, माथाडी कामगार, घर बांधकाम कामगार, महापालिका कामगार आदी क्षेत्रातील, आस्थापनांतील कामगार या संपात सहभागी होणार आहेत.

Leave a Comment