पोलिसांनी जप्त केला कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा पासपोर्ट


फसवणूकीच्या आरोपानंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या समोरील अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता रेमो डिसूझाचा पासपोर्ट गाझियाबाद पोलिसांनी जप्त केला आहे. सिहानी गेट पोलिस ठाण्यात रेमो डिसूझाच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेमो डिसूझाच्या विरोधात सत्येंद्र त्यागी नावाच्या एका व्यक्तीनं फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. त्यागी यांचा आरोप आहे की, रेमो डिसूझाशी 2013 मध्ये त्याची ओळख झाली होती. काही दिवसांनी रेमोने त्याचा चित्रपट ‘अमर मस्ट डाय’मध्ये 5 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले होते. त्यागी यांचे म्हणणे आहे की रेमोने त्यावेळी ही रक्कम दुपटीने परत करण्याचे आश्वासन दिले होते, पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने मूळ रक्कमही परत केली नाही.

आपले पैसे सत्येंद्र त्यागी यांनी परत मागितल्यावर 13 डिसेंबर 2016 मध्ये प्रसाद पुजारी नावाच्या एका व्यक्तीकडून रेमोने त्याला धमकी दिली. जर सत्येंद्रने पुन्हा रेमोकडे पैशांची मागणी केली तर त्याला जीवे मारण्याची धमकी या व्यक्तीने सत्येंद्र यांना दिली. त्यानंतर सत्येंद्र त्यागी यांनी गाझियाबादच्या सिहानीगेट पोलिस स्टेशनमध्ये रेमो डिसूझाच्या विरोधात तक्रार केली होती.

Leave a Comment