आयपीएस अधिकाऱ्याने वर्दीवर लावून घेतले सफाई कर्मचाऱ्यांकडून स्टार


जयपूर : प्रत्येकाच्या आयुष्यात सन्मान किंवा पुरस्कार मिळणे ही खास गोष्ट असते. एखाद्या खास व्यक्तीकडून आपला सन्मान व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. असेच काहीसे एक उदाहरण जगासमोर राजस्थानमधील जयपूरचे पोलिस अधिकारी राहुल प्रकाश यांनी ठेवले आहे. त्यांची डीसीपी पदावरुन डीआयजी म्हणजेच पोलिस उपमहानिरीक्षकपदी (वाहतूक) पदोन्नती झाली. त्यांनी समानतेचे उदाहरण देण्यासाठी चक्क सफाई कर्मचाऱ्यांकडून आपल्या वर्दीवर पदोन्नतीचे स्टार लावून घेतले.

31 डिसेंबर 2019 रोजी राहुल प्रकाश यांची पदोन्नती झाली. त्यांना डीसीपी पदावरुन डीआयजी पदावर (वाहतूक) पदोन्नती मिळाली. प्रत्येकाच्या आयुष्यात पदोन्नतीचे वेगळे महत्त्व असते आणि त्याचा आनंद साजरा करण्याची अनेकांची पद्धतही वेगळी असते. त्यांनी आपल्या पदोन्नतीचा आनंद समानतेचा संदेश देऊन साजरा केला. त्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षात सफाई करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांकडून पदोन्नतीचे स्टार लावून घेतले.

डीआयजी पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने सफाई कर्मचाऱ्यांकडून शोल्डर बॅज लावण्याची राजस्थानमधील कदाचित ही पहिलीच वेळ असावी. तुमच्याकडून सन्मानित होणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याची भावना राहुल प्रकाश यांनी सफाई कर्मचाऱ्यांकडे व्यक्त केल्या. या घटनेनंतर वाहतूक विभागात राहुल प्रकाश यांची जोरदार चर्चा आहे.

Leave a Comment