धुक्यात गाडी चालवताना फॉलो करा या टिप्स

भारतात गाडी चालवताना ट्रॅफिक जॅम आणि खड्डे या सारख्या समस्यांचा सामना करावा लागणे ही सामान्य बाब आहे. मात्र हिवाळ्यात आणखी एक समस्या असते ती म्हणजे धुक्याची. धुक्यामुळे अनेकदा कार चालवताना पुढील वाहन दिसत नाही. उत्तरेकडील भागात तर हिवाळ्यात धुक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. धुक्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. अशावेळी धुक्यात गाडी चालवताना काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी जाणून घेऊया.

वाहन हळू चालवा –

सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की धुक्यात आपल्याला गाडी हळू चालवायची आहे. जर तुम्ही ताशी 45-50 किमी वेगाने गाडी चालवत असाल तर तुम्ही तुमचा वेग कमी करून ताशी 25-30 किमी केला पाहिजे. यामुळे तुम्हाला पुढील गोष्टीचा अंदाज घेण्यास अधिक वेळ मिळेल व तुमचे ब्रेकिंग डिस्टंस देखील कमी होईल.

लेन बदलू नका –

धुक्यामध्ये गाडी चालवताना शक्यतो लेन बदलणे टाळा. रस्त्यावरील मार्किंगमुळे तुम्हाला रस्त्याच्या रुंदीबद्दल देखील समजते आणि यामुळे योग्य रस्त्यावर गाडी चालवण्यास मदत होते.

लो बिम आणि फॉग लाईट्सचा वापर करा –

धुक्यात गाडी चालवताना हाय बिमपेक्षा लो बिम नेहमी सुरू ठेवा. लो बिममुळे व्हिजिबिलिटी वाढते. याशिवाय फॉग लाईट्सचा देखील वापर करा.

गाडी चालवताना हॅझर्ड लँम्पचा वापर करू नका –

धुक्यात गाडी चालवताना सगळ्यात बेसिक चुक चालक करतात ती म्हणजे हॅझर्ड लँम्प सुरू ठेवतात. कार बंद पडली अथवा रस्त्याच्या कडेला उभी केली असल्यासच हॅझर्ड लँम्पचा उपयोग केला जातो. गाडी चालवत असताना हॅझर्ड लँम्पचा उपयोग केल्याने इतर चालकांचा गोंधळ होऊ शकतो.

थांबा आणि वाट बघा –

जर खूपच धुके असेल आणि गाडी चालवताना समोरील काहीच दिसत नसेल, तर अशावेळेस गाडी सुरक्षित ठिकाणी बाजूला थांबून वाट पहा. जोपर्यंत वातावरण व्यवस्थित होत नाही व समोरील गोष्ट योग्यरित्या दिसू शकतील तोपर्यंत वाट पहा. कारण एकवेळेस उशीर झाला तरी चालेल, मात्र सुरक्षितरित्या पोहचणे अधिक महत्त्वाचे असते.

Leave a Comment