नोव्हेंबर महिन्यात राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना ३०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या


मुंबई – राज्यात मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र जगण्यासाठी संघर्ष करत होता. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढ्या शेतकऱ्यांनी एका महिन्यात आत्महत्या करण्याची गेल्या चार वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. अनेक शेतकऱ्यांनी २०१५ मध्ये आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. यावेळी अनेकदा आत्महत्येचा आकडा ३०० हून अधिक असायचा.

पिकांचे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्षात येते. राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे फटका बसला आहे. तसेच जवळपास ७० टक्के पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. याआधी २०१५ मध्ये ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत गतवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात १८६ तर नोव्हेंबर महिन्यात ११४ शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या. सर्वात जास्त आत्महत्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात झाल्या आहेत. मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यात १२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले.

Leave a Comment