पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांना नववर्षाचे गिफ्ट


नवी दिल्ली – आज कर्नाटकमधील तुमकूरचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा करणार असून शेतकऱ्यांना नववर्षानिमित्त भेट देणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत १२ हजार कोटी जमा केले जाणार आहेत. ही रक्कम जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.

देशभरातील अनेक ठिकाणी कापणीचा हंगाम सुरु होणार असून शेतकऱ्यांना त्याआधी प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याने फायदा होईल. आर्थिक वर्षातील हा तिसरा हफ्ता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात है पैसे थेट जमा होणार आहेत. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करताना लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यावेळी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास दोन हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते.

एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यात जमा केली जाते. ही रक्कम तीन हफ्त्यांमध्ये दिली जाते. लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येक हफ्त्याला दोन हजार रुपये दिले जातात. पण या योजनेपासून पश्चिम बंगालमधील शेतकरी अद्याप वंचित आहेत. तेथील शेतकरी अद्यापही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेशी जोडले गेलेले नाहीत. विशेष म्हणजे, लाभार्थी शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात मिळणारा हफ्ता अद्यापही मिळालेला नाही.

Leave a Comment