गृहमंत्री अमित शहा गिरवत आहेत चक्क बंगाली भाषेचे धडे


नवी दिल्ली – 2021मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच गृहमंत्री अमित शहा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अमित शहा निवडणूकीमधील प्रचार सभेमध्ये जनतेसोबत थेट संवाद साधता यावा, यासाठी बंगाली भाषेचे धडे गिरवत आहे. त्यांनी एका बंगाली भाषा शिक्षकाची यासाठी नियुक्तीदेखील केली आहे.

बंगाली भाषेमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या सभेला संबोधित करतात. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारामध्ये किमान भाषणाची सुरवात बंगालीमध्ये करता यावी, जेणेकरून भाषणाचा जनतेवर प्रभाव पडले, अशी शहा यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक निवडणूकीसाठी शहा वेगळी रणनिती आखतात. महाराष्ट्र आणि झारखंडमधील सत्ता हातातून गेल्यानंतर पश्चिम बंगाल निवडणुकीची कमान शहा आपल्या हातामध्ये ठेवत आहेत.

अमित शहा गुजराती असूनही त्यांची हिंदी भाषेवर मजबूत पकड आहे. कारण, तुरुंगात असताना शहा यांनी हिंदी भाषेवर काम केले होते. शहा यांनी शास्त्रीय संगीत देखील शिकल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले. ममतांच्या तृणमूल काँग्रेस या प्रादेशिक पक्षाची पश्चिम बंगालमध्ये सत्ता राहिलेली आहे. ममतांनी नेहमीच बंगाली पेहराव, स्थानिक भाषा आणि संस्कृतीला महत्त्व दिल्यामुळे स्थानिक मतदारांवर त्यांचा प्रभाव राहिला आहे. शहा हीच क्लृप्ती अंगीकारण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा आहे. बंगाली भाषा आत्मसात करणे ही त्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे, असेही बोलले जात आहे.

Leave a Comment