जावाच्या पेराक मोटरसायकलचे बुकिंग सुरु


जावा या लोकप्रिय मोटरसायकल कंपनीच्या बहुप्रतीक्षित पेराक मोटरसायकलचे बुकिंग सुरु झाले असून बॉबर डिझाईनच्या या बाईकची एक्स शो रूम किंमत १.९५ लाख रुपये आहे. या बाईकला बीएस ६ इंजिन दिल्यामुळे तिची किंमत सहा हजार रुपयांनी वाढल्याचा खुलासा कंपनीने केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४६ साली पॅरीस मोटर शो मध्ये सादर पेराक बाईकवरून या मोटरसायकलला जावा पेराक असे नाव दिले गेले असल्याचे समजते.

या बाईकला ३३४ सीसी सिंगल सिलिंडर लिक्विड कुल इंजिन सिक्स गिअरबॉक्स सह दिले गेले आहे. या बाईकला बॉबर स्टाईल लांब स्विंगआर्म व मागे ट्विन सस्पेन्शनच्या जागी मोनोशॉक सस्पेन्शन दिले गेले आहे. ड्युअल चॅनल एबीएस सह दोन्ही टायर मध्ये डिस्क ब्रेक असून बाईक ला सिंगल पॅसेंजर सीट आहे. या बाईकला बाजारात रॉयल एन्फिल्ड सोबत स्पर्धा करावी लागणार आहे.

Leave a Comment