असे गुन्हे आणि अश्या विचित्र शिक्षा


जगभरात कुठेही गेलात आणि तुम्ही गुन्हा केल्याचे सिध्द झाले तर न्यायालय शिक्षा सुनावते असाच प्रघात आहे. तुमचा अपराध छोटा की मोठा यावर शिक्षेचे स्वरूप ठरते. मात्र जगात काही ठिकाणी अतिशय विचित्र वाटतील अश्या शिक्षा गुन्हेगाराला सुनावल्या गेल्या आहेत.

अमेरिकेचे उदाहरण द्यायचे तर तेथील मिसुरीत राहणाऱ्या डेव्हिड बेरी याला २०१८ साली अशीच विचित्र शिक्षा सुनावली गेली होती. डेव्हिडने शेकडो हरणांची शिकार केली होती. त्याच्यावर गुन्हा शाबित झाला तेव्हा न्यायाधीशांनी त्याला १ वर्ष तुरुंगवास दिलाच पण डिस्नेचे बाम्बी कार्टून रोज पाहण्याची शिक्षाही फर्मावली होती. २००३ साली अमेरिकेतच शिकागो मध्ये दोन मुलांनी नाताळच्या दिवशी मसीहाची मूर्ती चर्च मधून चोरली आणि तिचे नुकसान केले. तेव्हा त्यांना ४५ दिवसांचा तुरुंगवास आणि एका गाढवाबरोबर परेड करण्याची शिक्षा दिली गेली होती.


अमेरिकेच्या ओक्लाहोमा येथे १७ वर्षीय टाईलर दारू पिऊन गाडी चालविताना सापडला. या अपघातात त्याच्या दोस्ताचा मृत्यू झाला. २०११ मध्ये ही घटना घडली तेव्हा तो शाळेत होता. न्यायाधीशांनी त्याला शाळेचे तसेच पदवी शिक्षण पूर्ण करण्याची, १ वर्ष दारू, चरसला हात न लावण्याची आणि १० वर्षे चर्चमध्ये जाण्याची शिक्षा सुनावली होती.

स्पेन मध्ये एका २५ वर्षीय मुलाने आईवडील पॉकेटमनी देत नाहीत म्हणून त्यांच्याविरोधात कोर्टात दावा दाखल केला तेव्हा न्यायाधीशांनी उलट त्यालाच आईवडिलांचे घर सोड आणि स्वतःच्या पायावर उभा राहा असे सुनावले. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार २००८ मध्ये अँड्र्यू वेक्टर नावाच्या माणसाने त्याच्या कार मध्ये उंच आवाजात रॅप संगीत लावले होते. तेव्हा त्याला १२० पौंड दंड केला गेला पण त्याने जर बीथोवन, बाख, शोपेन यांचे शास्त्रीय संगीत २० तास ऐकले तर दंडाची रक्कम ३० पौंडावर आणायची तयारी दाखविली होती.

Leave a Comment