विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे लोटला भिमसागर

vijaystambh
पुणे – मोठ्या संख्येने भिमसागर कोरेगाव-भीमा येथे ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लोटला असून विजयस्तंभाला त्यानिमित्ताने फुलमाळांनी सजवण्यात आले आहे. येथे रात्री १२ वाजण्याच्या सुमारास फटाक्याची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देऊन नववर्षाची सुरुवात केली जाते. सोमवारी त्यानिमित्ताने दिवसभर विजयस्तंभाची सजावट सुरू होती. आंबेडकर प्रेमींनी शौर्यदिवस साजरा करण्यासाठी रात्रीपासून गर्दी केली आहे. गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने उपस्थितांना थंडीचा सामना करावा लागत आहे.

१ जानेवारी १८१८ साली कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. यामध्ये पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पाडाव करून विजय मिळविला होता. महार रेजिमेंटच्या अनेक शुरविरांना या लढाईत हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी १९२७ सालापासून येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव १ जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे कोरेगाव भीमाला येत असतात.

Leave a Comment