हेमा मालिनींसह देओल परिवाराविरोधात संजय काकडेंची न्यायालयात धाव


पुणे – राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुणे न्यायालयात अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता खासदार सनी देओल, अभिनेता बॉबी देओल, अभिनेत्री ईषा देओल, उषा अजितसिंग देओल, अहाना देओल, प्रकाश देओल, विजयसिंग देओल, अजितसिंग देओल यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात धाव घेतली आहे. धर्मेंद्र यांचे कुटुंबीय आणि काकडे यांच्यात लोणावळा येथील 185 एकर जागेच्या संर्दभात व्यवहार झाला होता.

सदर जागेवर दोघे मिळून जे. डब्ल्यू. मेरियट रिसोर्ट व बंगल्याची स्कीम करणार होते. धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे पैसे देऊनही जमिनीची नोंदणी करण्यास ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप खासदार काकडे यांनी केला आहे.

काकडे यावेळी म्हणाले, 31 मे 2018 रोजी खासदार संजय काकडे आणि अभिनेता धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या कुटुंबीयासोबत लोणावळामधील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाजवळील जागेचा व्यवहार निश्चित झाला. धर्मेंद्र यांचे कुटुंबीयाच्या मालकीची सदर ठिकाणी एकूण 215 एकर जागा आहे. धर्मेंद्र यांचा त्यापैकी 25 एकर जागेत बंगला आणि आजू-बाजूचा परिसर आहे. उर्वरित 185 एकर जागेपैकी 100 एकर जागेवर जे.डब्ल्यू मेरियट हे अलिशान पंचतारांकित रिसोर्ट उभारले जाण्याचे नियोजित आहे. काकडे आणि धर्मेंद्र यांचे कुटुंबीय याकरिता निम्मा-निम्मा खर्च करण्याचे ठरले आहे. त्यापैकी 30 टक्के उत्पन्न धर्मेंद्र कुटुंबीय तर 70 टक्के उत्पन्न काकडे घेणार असे ठरविण्यात आले.

तर, संजय काकडे हे 85 एकर जागेवर बंगल्यांची स्कीम बांधून त्याची विक्री करणार असून त्यातील नफ्याचे उत्पन्न दोघे मिळून निम्मे-निम्मे वाटून घेणार असल्याचे निश्चित झाले होते. सदर व्यवहार दोघांमध्ये ठरल्यानंतर काकडे यांनी डिपॉझिट रक्कम धर्मेंद्र कुटुंबीयास दिल्यानंतर जमिनीची नोंदणी तातडीने करून कामाला सुरुवात करणे, अपेक्षित होते. पण, धर्मेंद्र व त्यांच्या मुलांनी चित्रपटाचे काम होऊ दे, निवडणूक होऊ दे, असे सांगत 18 महिने होऊनही नोंदणी करण्यास टाळाटाळ केल्यामुळे काकडे यांनी याबाबत धर्मेंद्र यांच्याकडे तसेच त्यांच्या वकिलासोबत 20 वेळा बैठका घेऊनही पुढे काम जात नव्हते.

काकडे यांनी सांगितले की, माझ्याकडून व्यवहार ठरल्यानंतर पैसे घेऊनही पूर्ण जागा देण्यास नकार देत 85 एकर जागा घ्या, आम्ही हॉटेलचे काम पाहतो, असे सांगत टाळाटाळ केली गेली. काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून माझ्यावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला गेला. परंतु, सदर व्यवहाराची कागदपत्रे पाहिल्यानंतर वरिष्ठ राजकीय नेत्यांनी माझी बाजू योग्य असल्याचे सांगितले. दुसरी एखादी मोठी पार्टी धर्मेंद्र कुटुंबीयांना व्यवहाराकरिता मिळाली असावी, त्यामुळे माझ्यासोबत व्यवहार करण्यास ते टाळाटाळ करत असल्याचे काकडे यांनी सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी आर. व्ही. रोटे न्यायालयात 10 जानेवारीला होणार असून संबंधित प्रकरणात धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना हजर राहण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

Leave a Comment