आता महिला क्रिकेटपटूंना मिळणार प्रसुती रजा!


सिडनी: प्रत्येक नोकरदार महिलेला मातृत्वानंतर आपल्या करिअर सोडावे लागेल अशी चिंता सतावत असते. त्याच बरोबर त्यांचे नोकरी सोडल्यामुळे आर्थिक नुकसान देखील होत असते. त्यातच क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास एक वर्षापेक्षा अधिक काळ महिला खेळाडूंना खेळापासून दूर रहावे लागते. पण यासंदर्भात एक नवा आदर्श ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने निर्माण करुन दिला आहे.

आई होणाऱ्या क्रिकेटपटूंना एक वर्षाची सुट्टी आणि त्या काळातील वेतन देखील देण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया संघातील क्रिकेटपटू जेस डफिन हिला या निर्णयाचा फायदा झाला आहे. ती क्रिकेट बोर्डाच्या या योजनेचा फायदा मिळणारी पहिली क्रिकेटपटू ठरली. १२ महिन्याची सुट्टी आणि त्या काळातील पगार जेसला यामुळे मिळणार आहे.

त्याचबरोबर बाळाचा जन्म होण्याआधीपर्यंत ती क्रिकेट न खेळण्यासंदर्भातील निर्णय देखील घेऊ शकते. ऑस्ट्रेलिया हे अशा प्रकारची योजना सुरु करणारे पहिलेच क्रिकेट बोर्ड ठरावे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकडे देखील अशा प्रकारची कोणतीही योजना नाही.

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार डायना एडुल्जीने सांगितले की, अशा प्रकारची मातृत्वासाठीची सुट्टी भारतात महिला क्रिकेटपटूंना मिळत नाही. तर टीम इंडियाकडून ६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या रीमा मल्होत्राच्या मते, बीसीसीआयकडे अशा प्रकारचे प्रकरण आले नाही. २१ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये जेस डफिन खेळणार आहे. मेलबर्न येथे झालेल्या टी-२० लीगमध्ये जेसने संघाचे नेतृत्व केले होते. लीगमध्ये संघाचे नेतृत्व करत असताना जेस गर्भवती होती.

Leave a Comment