
2020 या वर्षात अनेक इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, एमजी मोटर्स आणि निसान यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या नवीन वर्षात कोणत्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय बाजारात लाँच होणार आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

टाटा नेक्सॉन ईव्ही –
टाटाची पहिली इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्हीला कंपनीने 19 डिसेंबरला लाँच केले होते. या वर्षी ही कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. या कारमध्ये जिप्ट्रॉन इलेक्ट्रिक पॉवरट्रेन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
या कारमध्ये 30.2 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जो 129 एचपी पॉवर आणि 254 एनएम टॉर्क देतो.कंपनीने याछ लीथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे.
बॅटरी पॅकमध्ये लिक्विड कूलिंग फिचर मिळेल, जेणेकरून गरम तापमानात देखील कार चांगला परफॉर्मेंस करू शकेल. कंपनीने दावा केला आहे की एकदा फूल चार्ज केल्यावर कार 300 किमीपर्यंत चालेल. या कारची किंमत 15 ते 17 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

टाटा अल्ट्रोज ईव्ही –
टाटा मोटर्सची प्रिमियम हॅचबॅक अल्ट्रोज ईव्ही जानेवारी 2020 मध्ये लाँच होईल. यामध्ये देखील जिप्ट्रॉन इलेक्ट्रिक पॉवरट्रेन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. एकदा फूल चार्ज केल्यावर कार 300 किमीपेक्षा अधिक अंतर पार करेल.

एमजी झेएस ईव्ही –
एमजी मोटर आपली नवीन इलेक्ट्रिक कार ZS EV (झेडएस ईव्ही) ला लवकरच भारतात लाँच करणार आहे. जानेवारीमध्ये ही कार लाँच होऊ शकते. या कारमध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 143ps पॉवर आणि 353Nm टॉर्क जनरेट करते. यात 44.5kWh लिक्विड-कूल्ड लिथियम ऑयन बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर ही एसयूव्ही 340 किमीपर्यंत चालेल. ही कार केवळ 8.5 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते. कारची किंमत 15 ते 20 लाखांमध्ये असण्याची शक्यता आहे.

महिंद्रा केयूव्ही100 ईव्ही
महिंद्रा ही कार फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करणार आहे. यामध्ये 40kW AC इंडक्शन मोटर आणि ई-वेरिटो 72V लिथियम-आयन बॅटरी दिली जाऊ शकते. फूल चार्जिंगमध्ये कार 140 किमी अंतर पार करू शकते. ही कार एका तासात 80 टक्के चार्ज होईल. या कारची किंमत 8 ते 10 लाख रुपये असेल.

महिंद्रा एक्सयूव्ही300 ईव्ही –
महिंद्रा आपली लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही एक्सयूव्ही300 चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणत आहे. ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायासह उपलब्ध असेल. यामध्ये स्टँडर्ड एसी चार्जरसोबत डीसी फार्स्ट चार्जिंग सोपर्ट मिळेल.

मारूती वॅगन आर ईव्ही –
मारुतीची लोकप्रिय कार वॅगन आरचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात दाखल होणार आहे. रिपोर्टनुसार, यात 72 वॉल्ट सिस्टम आणि 10-25 kWh बॅटरी पॅक मिळेल. एकदा चार्ज केल्यावर ही कार 200 किमी अंतर पार करू शकते. कंपनीने दावा केला आहे की डीसी चार्जरद्वारे केवळ 40 मिनिटात 75 ते 80 टक्के चार्जिंग होईल. या कारचे अंदाजे किंमत 7 ते 10 लाखांमध्ये असेल.

निसान लीफ –
जगभरात सर्वाधिक विकलेली इलेक्ट्रिक कार लिसान लीफ यावर्षी भारतात लाँच होईल. या कारमध्ये EM57 इलेक्ट्रिक मोटर मिळेल, जी 150 पीएस पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करेल. यामध्ये 40 kWh लीथियम बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. लीफची बॅटरी स्टँडर्ड चार्जरवर फूल चार्जिंग होण्यासाठी 16 तास तर 6 kW चार्जरवर 40 मिनटात 80 टक्के चार्ज होते. कंपनीने दावा केला आहे की, सिंगल चार्जमध्ये कार 400 किमी अंतर पार करेल.