वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागला घरगुती गॅस सिलेंडर


नवी दिल्ली : गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९ रुपयांची पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी वाढ केली आहे. सिलिंडरच्या किमतीत सलग पाचव्या महिन्यात वाढ झाली असून नववर्ष स्वागताच्या जल्लोषात मग्न झालेल्या ग्राहकांची झिंग गॅस दरवाढीने उतरणार आहे. गॅस सिलिंडर वर्षाच्या पहिल्याच दिवशी १९ रुपयांनी महागला आहे तर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दिल्लीत १४.२ किलोचा गॅस सिलिंडरचा दर आता ७१४ रुपये झाला आहे. मुंबईत ग्राहकांना घरगुती गॅससाठी ६८४.५० रुपये मोजावे लागतील. १९.५० रुपयांनी मुंबईत गॅस सिलिंडर महागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ३३ रुपयांची वाढ झाली आहे.

सिलिंडरच्या दरात मे-जूनपासून वाढ होत आहे. जागतिक कमोडीटी बाजारावर चीन आणि अमेरिका यांमधील व्यापारी संघर्षामुळे परिणाम झाला आहे. एलपीजीच्या किमतींवर आंतरराष्ट्रीय बाजारात परिणाम होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेत आहेत. इंधन आयातीच्या खर्चात चलन विनिमय दरातील बदल वाढ करतात. २०१९ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयात २.२८ टक्के अवमूल्यन झाले.

घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलोचा गॅस सिलिंडर ३३ रुपयांनी महागला आहे. छोट्या व्यावसायिकांना दरवाढीची झळ सोसावी लागले. यामुळे हॉटेल व्यवसायिकांकडून दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर ठेवला. मुंबईत पेट्रोल ८०.७९ आणि डिझेल प्रति लीटर ७१. ३१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ७५.१४ आणि डिझेल प्रति लीटर ६७. ९६ रुपये आहे.

Leave a Comment