स्मार्टफोन मागणीत प्रचंड वाढीचे संकेत


देशात एकीकडे ऑटो क्षेत्रात मंदी सदृश परिस्थिती जाणवत असताना शहरी आणि ग्रामीण भागात स्मार्टफोनच्या मागणीत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. काउंटरपॉइंट रिसर्च असोसिएशनचे संचालक तरुण पाठक यांनी या संदर्भात माहिती देताना २०१९ मध्ये स्मार्टफोन विक्रीत ९ टक्के वाढ नोंदविली गेल्याचे सांगितले तसेच २०२० मध्ये ही वाढ १२ ते १५ टक्के असेल असेही स्पष्ट केले.

स्मार्टफोन मागणी वाढण्यामागे सरकारी योजना कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. अॅपलसारख्या अनेक कंपन्यांना भारतात उत्पादन प्रकल्प उभारणीसाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्याचा परिणाम म्हणजे अनेक परदेशी स्मार्टफोन कंपन्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प सुरु केले आहेत. यामुळे २०२२ पर्यंत देशात ७० कोटी स्मार्टफोन युजर असतील आणि पुढच्या ४ ते पाच वर्षात ही संख्या १ अब्जचा आकडा ओलांडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदाच्या सर्व्हेक्षणात असेही दिसून आले की काही वर्षापूर्वी ५ ते १० हजार किमतीच्या स्मार्टफोन साठी अधिक मागणी होती. मात्र आता १० ते १५ हजारापर्यंतच्या स्मार्टफोनना अधिक मागणी आहे. देशात १४२०० तसेच २१४०० ते ३५६०० रु. किमतीच्या स्मार्टफोनचा बाजारातील हिस्सा ८० टक्के आहे.

मार्च २०२० पर्यंत पहिला ५ जी फोन बाजारात दाखल होईल. रियलमी इंडियाने तशी तयारी केली आहे. मात्र ५ जी स्मार्टफोनच्या विक्री वाढीसाठी पहिले सहा महिने वाट पहावी लागेल. याचे कारण म्हणजे सुरवातीला या फोनच्या किमती अधिक असतील पण वर्ष दीड वर्षात हे फोन १० ते २५ हजाराच्या दरम्यान ग्राहकांना मिळू शकतील.

Leave a Comment