सत्तर वर्षांनंतर आज रामललांना चढविले जाणार ५६ भोग


रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ७० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज म्हणजे १ जानेवारीला, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रामललांना ५६ भोग म्हणजे ५६ प्रकारचे नैवद्य दाखविले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार १९९२ सालापासून बाबरी मशीद, रामजन्मभूमी विवाद सुरु झाल्यानंतर भगवान राम त्यांच्या तीन भावंडांसह एका तंबूवजा जागेत विराजमान आहेत. येथे भगवान राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत यांच्या बालरूपातील मूर्ती आहेत. आज भोग चढविताना रामाला नवी हिरवी वस्त्रे चढविली जाणार आहेत.

आज रामलला आणि हनुमान गढी येथे दर्शनासाठी ७० हजाराहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. सुप्रीम न्यायालयाचा निकाल आल्यानंतर रोज किमान २० हजार भाविक येथे दर्शनासाठी येत असून दानपेटीत १५ दिवसात जवळजवळ दुप्पट रक्कम जमा होऊ लागली असल्याचेही समजते. दानपेटीत रोज ६ लाखापेक्षा अधिक रक्कम जमा होत आहे.

केंद्र सरकार ९ फेब्रुवारी रोजी राममंदिर ट्रस्ट स्थापन करणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामनवमीच्या दिवशी मंदिर निर्माण कार्य सुरु केले जाणार आहे. १०० एकर परिसरात हे बांधकाम होणार असून तिरुपती बालाजी आणि व्हॅटीकन सिटी च्या धर्तीवर हे काम केले जाणार आहे. नव्या मंदिरात प्राचीन मंदिराचे अवशेष वापरले जाणार आहेत. १२ व्या शतकात विक्रमादित्याने भव्य राममंदिर बांधले होते त्याचे काही अवशेष उत्खननात सापडले आहेत. त्यात काही फरश्यांचे तुकडे मिळाले आहेत.

मंदिर परिसरात लेझरशो च्या माध्यमातून रामकथा दाखविली जाणार आहे. तसेच भव्य संग्रहालय उभारले जाणार असून त्यात या परिसरात मिळालेले पौराणिक अवशेष जतन केले जातील असे सांगितले जात आहे. राम रसोई लंगर बांधला जात असून शेषावतार मंदिर बांधले जाणार आहे.

Leave a Comment