मंत्रालयातील अशुभ ६०२ नंबर केबिन घेण्यास अजित पवारांचा नकार


सोमवारी महाराष्ट्रात महाआघाडी सरकारच्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यावर आता मंत्र्यांना केबिन देण्याचे काम सुरु झाले असतानाच मंत्रालयात ६ व्या मजल्यावरच्या ६०२ नंबरच्या केबिनविषयी चर्चा गुपचूप सुरु झाली आहे. ६०२ नंबरची ही केबिन अशुभ असल्याचे सांगितले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार याना ही केबिन दिली जाणार होती मात्र त्यांनी ही केबिन घेण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे समजते.

वास्तविक मंत्रालयातील काही प्रशस्त केबिन मध्ये या केबिनचा समावेश आहे. पूर्वी या केबिन मध्ये मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि वरिष्ठ मंत्री बसत असत. पण या केबिन मध्ये काम करणारा मंत्री त्याचा कार्यकाल पूर्ण करू शकत नाही अशी या केबिनची ख्याती झाली आहे. अजित पवार यांनीही पूर्वी ही केबिन वापरली आहे पण आता मात्र त्यांनी ही केबीन घेण्यास नकार दिला आहे.

२०१४ मध्ये ही केबिन युती सरकारातील भाजपचे मंत्री एकनाथ खडसे याना दिली गेली होती पण दोन वर्षात ते जमीन घोटाळ्यात अडकले आणि त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ही केबिन पांडुरंग फुंडकर याना दिली गेली पण दोन वर्षात त्यांचे हार्ट अॅटॅक येऊन निधन झाले. त्यानंतर काही काळ ही केबिन कुणालाच दिली गेली नव्हती. मात्र त्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांच्याकडे कृषी विभागाची जबाबदारी आल्यावर त्यांना ही केबिन दिली गेली. पण त्यानंतर ते विधानसभा निवडणूक हरले.

या केबिनचा एरिया ३००० चौरस फुट आहे. त्यात ऑफिस स्टाफसाठी एक मोठा हॉल, दोन मोठ्या केबिन आहेत. नव्या मंत्रिमंडळात ४३ मंत्री आहेत. त्यात कुणाच्या वाट्याला ही केबिन येणार याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

Leave a Comment