मराठमोळ्या जनरल मनोज नरवणे यांनी स्वीकारला लष्करप्रमुख म्हणून पदभार


नवी दिल्ली – मंगळवारी औपचारिकपणे लष्करप्रमुखपदाचा पदभार जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी स्वीकारला असून त्यांनी पदभार मावळते प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडून स्वीकारला. देशाचे ते २८ वे लष्करप्रमुख झाले आहेत. सैन्यदलातील उच्चपदावर मनोज नरवणे यांच्या रुपाने मराठमोळे अधिकारी पोहोचले आहेत.

उपसेनाप्रमुख म्हणून सध्या मनोज नरवणे कार्यरत होते. त्यांनी तत्पूर्वी भारतीय सैन्याच्या पूर्व कमांडचे नेतृत्त्व केले होते. या कमांडकडे चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमेचे रक्षण करण्याचे काम असते. मनोज नरवणे यांनी एकूण ३७ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये विविध मोहिमांचे नेतृत्त्व केले. उग्रवाद्यांविरोधातील मोहिमांचे नेतृत्त्वही त्यांनी केले आहे.

त्यांचा श्रीलंकेतील शांती रक्षक दलाचा तुकडीमध्ये सहभाग होता. त्याचबरोबर त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियनचे नेतृत्त्वही केले आहे. भारतीय सैन्य अकादमी आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे ते छात्र आहेत. १९८० मध्ये ते शीख लाईट इन्फ्रंटी रेजिमेंटमधून सेवेत आले होते.

Leave a Comment