क्रेडिट कार्ड वापरताना या चुका केल्यास होईल मोठे नुकसान

Image Credited – Jagran

क्रेडिट कार्डचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. बँकांकडून अनेकदा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी फोन येत असतात. ते ग्राहकांच्या गरजेनुसार क्रेडिट कार्डची ऑफर देतात. मात्र क्रेडिट कार्डचे हे कर्ज खूप महागडे असते. माहिती नसल्याने लोक क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकतात. क्रेडिट कार्ड वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याविषयी जाणून घेऊया.

गरज असेल तरच घ्या क्रेडिट कार्ड –

जर खूपच गरज असेल तर क्रेडिट कार्ड घ्यावे. केवळ फॅशन म्हणून क्रेडिट कार्ड घेऊ नये. क्रेडिट कार्डवर मासिक व्याजदर हा 2 ते 3 टक्के असतो. हा व्याजदर कमी वाटतो, मात्र वार्षिक व्याज काढल्यास हे व्याज खूप होते.

कर्ज परत करण्यास अडचण असेल तर कार्ड परत करा –

माहिती अभावी ग्राहक क्रेडिट कार्डच्या जाळ्यात अडकत जातात. जर तुम्हाला क्रेडिट कार्डवरील कर्ज परत करण्यास समस्या येत असेल, तर सर्वात प्रथम कार्डचा वापर करणे बंद करा व कर्ज पुर्ण भरल्यानंतर कार्ड परत देऊन टाका. कर्ज परत करण्यासाठी योजना बनवा. तुमच्यावर इतरही कर्ज असल्यास सर्वात प्रथम क्रेडिट कार्डचे कर्ज परत करा.

इमर्जेंसी असेल तरच रोख रक्कम काढा –

क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम काढणे टाळावे. क्रेडिट कार्ड वापरण्याची ही सर्वात चुकीची पद्धत आहे. क्रेडिट कार्डवरून रोख रक्कम काढल्यास कोणतेही व्याज फ्री कालावधी मिळत नाही.

क्रेडिट कार्डचे बिल लवकर भरावे –

वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल न भरणे त्रासदायक ठरू शकते. कधीही पेमेंट रिमाइंडरकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर कमी होईल आणि तुम्हाला पुढे कोणतेही कर्ज मिळण्यास अडचण येईल. पेमेंट न भरल्यास तुम्ही भविष्यात डिफॉल्टर देखील बनू शकता.

Leave a Comment