शनीचा प्रकोप नको मग तुरुंगातील रोटी खा


आपल्या ग्रहमालेतील शनी हा फार पीडादायक ग्रह मानला जातो. शनीची साडेसाती सुरु होणार या कल्पनेनेच अनेक जण भयभीत होतात आणि शनीच्या प्रकोप टळावा म्हणून अगोदरपासूनच विविध उपाय सुरु करतात. येत्या २४ जानेवारीला शनी महाराज मकर राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता ज्या राशीच्या लोकांना साडेसाती सुरु होणार यांनी काय उपाययोजना केल्या हे समजलेले नसले तरी चंदिगढ मधील काही मंत्री, राजकीय नेते, आयएएस, प्रशासकीय अधिकारी मात्र तयारीला लागले आहेत अशी बातमी आहे.

शनीचा प्रकोप कमी होण्याचा ज्योतिष शास्त्रनुसार एक उपाय असा सांगितला जातो की तुरुंगातील रोटी खाल्ली तर शनीचा प्रकोप होत नाही. चंदिगढच्या बुरेल मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी बनविलेले जेवण आणि अन्य पदार्थ बाहेरच्या लोकांना विकत देण्याची सुविधा सुरु झाली असून हे जेवण ऑनलाईनवर सुद्धा मागविता येते. जेल अधीक्षकानी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात या जेल मधून जेवण मागविणाऱ्यात नेते, मंत्री, प्रशासकीय अधिकारी तसेच अन्य अधिकारी यांची संख्या लक्षणीय रित्या वाढली आहे. एप्रिल २०१७ मध्ये जेल किचन योजना सुरु झाली आणि एका वर्षात त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक वर्षात या तुरुंगाने ३८७४३ ऑर्डर पुऱ्या करून ५४.८६ लाख रुपयंची कमाई केली आहे. येथे कैदी लोकांनी बनविलेले सामोसे, चहा, बिस्किटे सुद्धा विक्रीसाठी असून त्यातून एक वर्षात ८.१४ लाखची कमाई जेलला झाली आहे.

Leave a Comment