या गावात तुम्ही भेटू शकता कौरव पांडवांच्या वंशजांना


उत्तराखंड ही आपल्या देशाची देवभूमी मानली जाते. या राज्याची अद्भूत संस्कृती, परंपरा आणि रामायण महाभारताशी संबंधित अनेक ठिकाणे यामुळे हे राज्य पर्यटकांच्या आवडीचे आहे. शिवाय येथील निसर्गसौंदर्य आणि हिमाच्छादित शिखरे हा पर्यटकांच्या आकर्षणाचा आणखी एक भाग. या राज्यात पर्यटन विकास चांगला झाला असला तरी अजूनही अश्या अनके जागा आहेत ज्याची पर्यटकांना फारशी माहिती नाही. त्यातील एक आहे कलाप हे ठिकाण.

उत्तराखंडच्या गढवाल भागातील एक छोटेसे पण फारच सुंदर असे हे ठिकाण आहे. मात्र आजही येथे जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत त्यामुळे ते बाकी राज्यापासून अलग पडले आहे. येथील लोकसंख्या कमी आहे. टून्स घाटी मध्ये असलेले हे छोटेसे गाव म्हणजे महाभारताची जन्मभूमी मानले जाते.


येथे रामायण आणि महाभारताशी संबंधित इतिहास जोडलेला आहे. येथील लोक स्वतःला कौरव आणि पांडवांचे वंशज मानतात. येथील मुख्य उद्योग शेती हाच आहे आणि येथील लोकांचे आयुष्य खडतर आहे. शेळ्या मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय येथे केला जातो. या गावात पांडवांचा मोठा भाऊ कर्ण याचे सुंदर मंदिर असून त्याला कर्ण महाराज मंदिर असे म्हटले जाते. येथे १० वर्षातून एकदा कर्ण महोत्सव साजरा होतो. तसेच जानेवारीत पांडव नृत्य कार्यक्रम होतो.


रुपीन नदीकाठी हे गाव वसलेले असून समुद्र सपाटीपासून ७८०० फुट उंचीवर आहे. येथे पर्यटन विकासाचे काम सुरु झाले आहे. सध्या कल्प नावाची एनजीओ सामुदायिक पर्यटनसाठी मदत करते. त्यात होम स्टे, ट्रेकिंग यांची सोय केली जाते. हे गाव चोहोबाजूंनी घनदाट देवदार वृक्षांनी वेढलेले असून येथील लोकांशी गप्पा केल्या तर महाभारतील अनेक अद्भूत आणि आकर्षक कथा ऐकायला मिळतात. देहरादून पासून हे ठिकाण २१० किलोमीटरवर आहे.

Leave a Comment