उद्धव ठाकरेंचे संभाजीराजेंना आवाहन, राजीनामा देऊ नका


मुंबई : रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोल्हापूर संस्थानचे युवराज तथा राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी यावेळी रायगडावर प्राधिकरणामार्फत होत असलेल्या विकासकामांतील भ्रष्टाचार, सारथी संस्थेची स्वायत्तता आणि सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाचा लढा याबाबत सविस्तर चर्चा केली. रायगडाच्या कामात काही भ्रष्टाचार झाले असतील तर त्याची चौकशी करू. लवकरच तेथील विकासाबाबतही बैठक लावून निर्णय करू, पण प्राधिकरणाचा तुम्ही राजीनामा देऊ नका, अशी गळ मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना घातली.

आपल्याच नेतृत्वात रायगडाचे काम हे झाले पाहिजे, ही केवळ माझीच इच्छा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांची मागणी आहे. मागील अनेक वर्षांपासून तुम्ही गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहात. प्राधिकरणावर तुम्ही आहात म्हणून सर्वकाही सुरळीत सुरु आहे. मी तुम्हाला येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. फक्त तुम्ही राजीनामा देऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याची माहिती संभाजीराजे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

राज्य सरकारने मराठा समाजातील तरुणांच्या मदतीसाठी बार्टीच्या धर्तीवर नेमलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या स्वायत्ततेसाठी बैठकीत मी आग्रही मागणी केली. मराठा समाजातील हजारो युवकांना सारथी संस्थेचा लाभ होत असून या माध्यमातून समाजातील येणाऱ्या अनेक पिढ्यांना घडवण्याचे कार्य होणार आहे. या संस्थेच्या स्वायत्ततेवर घाला येऊ देऊ नका, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या असलेल्या लढ्यात पूर्वीच्याच वकिलांना ठेवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. आरक्षणाच्या लढ्यात कुठल्याही परिस्थितीत कमतरता ठेवली जाणार नाही. हा लढा पूर्वीपेक्षाही जास्त ताकदीने लढू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे संभाजीराजे म्हणाले.

Leave a Comment