2019 मध्ये फेसबुकला या अ‍ॅपची धोबीपछाड

Image Credited – The Next Web

स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर जसजसा वाढत चालला आहे, तसतसे काही ठराविक सोशल मीडिया अ‍ॅपच्या भौवती आपले आयुष्य वेढले गेले आहे. यामध्ये सर्वात पुढे फेसबुक हे अ‍ॅप आहे. या दशकात मोबाईल अ‍ॅपच्या जगात फेसबुकचे वर्चस्व होते. या काळात तब्बल 460 कोटी फोनमध्ये फेसबुक डाउनलोड करण्यात आले. तर दुसऱ्या क्रमांकावर फेसबुक मेसेंजर हे अ‍ॅप होते. मात्र 2019 मध्ये टिकटॉकने फेसबुकला जबरदस्त आव्हान देत डाउनलोडच्या बाबतीत पहिले स्थान मिळवले आहे.

मोबाईल मार्केटिंग डेटा कंपनी अ‍ॅप एनीच्या आकड्यांनुसार, डाउनलोडच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर देखील फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेंजिग अ‍ॅप आहे. अ‍ॅप एनीने 2010 ते 2019 या काळात डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्सच्या डेटावरून हे विश्लेषण केले आहे.

यानुसार, 2019 मध्ये फेसबुक डाउनलोड करणाऱ्यांची संख्या 11 टक्क्यांनी कमी झाल्याने टिकटॉक टॉपवर पोहचले आहे.

भारतात देखील सर्वाधिक वेळा टिकटॉक हेच अ‍ॅप डाउनलोड करण्यात आले. 2019 मध्ये टिकटॉक 20 कोटीवेळा डाउनलोड करण्यात आले. तर फेसबूक 16 कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले. यानंतर सर्वाधिक वेळा डाउनलोड केलेल्या अ‍ॅपमध्ये लाइकी (14 कोटी), व्हॉट्सअ‍ॅप (13.4 कोटी) आणि फेसबुक मेसेंजरचा समावेश आहे.

Leave a Comment