शिवसेनेने केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांच्या अगदी विरोधात भूमिका घेतली


मुंबई – देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) विरोध केला असून यामध्ये भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचाही समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेनेने घेतलेल्या भुमिकेवर टीका केली असून शिवसेनेने केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या अगदी विरोधात भूमिका घेतली असून ते अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

हे दुर्दैवी आहे की, शिवसेनेने केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या अगदी विरोधात भूमिका घेतली आहे. निर्वासितांना शरण देऊ आणि घुसखोरांना हाकलून देऊ, असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. पण शिवसेना आता बदलली असल्यामुळे ते आता बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राटही म्हणत नाहीत. बांगलादेशवासी तसेच घुसखोरांबद्दल बाळासाहेब काय बोलले होते हे शिवसेना विसरुन गेल्याचे प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

देशभरात सीएए आणि एनआरसीवरुन सुरु असलेल्या आंदोलनावर यावेळी त्यांनी भाष्य करताना, राजकीय स्वार्थासाठी हा गोंधळ जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचा आरोप केला. सीएए आणि एनआरसी यांचा काडीमात्र संबंध नाही. दोघांमध्ये खूप फरक असून एनआरसीचा उल्लेख आसामबाहेर कुठेही झालेला नाही. कॅबिनेटसमोरही अद्याप विषय आला नसल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिली.

मुस्लिमांना सीएएमध्ये नाकारण्याचा प्रश्नच नाही, मुस्लिम भारतात धार्मिक छळाला कंटाळून आलेले नाहीत. कोणतीही शंका मुस्लिम समाजाच्या मनात निर्माण होत असल्यास ती दूर करण्यास आम्ही नेहमी तयार असल्याचे यावेळी प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर सीएए आणि एनआरसीसंबंधी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सरकार कमी पडल्याचे यावेळी त्यांनी मान्य केले.

आम्ही लोकांच्या शंकांचे निरासन करण्यासाठी कायदा संमत झाल्यानंतर तात्काळ संवाद साधायला हवा होता. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी याचाच फायदा घेत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. पण आम्ही आता लेख, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सर्वांचे संशय दूर करत जनजागृती करत असल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

Leave a Comment