जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री लेण्यांबद्दल शिवसेनेच्या माजी खासदारचे वादग्रस्त वक्तव्य


पुणे – शिवसेनेचे शिरुरमधील माजी खासदार आणि विद्यमान उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तुमची लेण्याद्री लेणी बघायला कुत्रही येत नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य जुन्नरमधील लेण्याद्री येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. स्थानिक गावकरी, लेणी अभ्यासक आणि इतिहासतज्ज्ञांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

येथील स्थानिक नागरिक मागील अनेक वर्षांपासून लेण्याद्री येथील अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या लेण्याद्रीच्या दर्शनसाठी विनाशुल्क प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करत आहे. त्यांनी यासाठी उपोषणही सुरु केले आहे. याच उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी शनिवारी आढळराव लेण्याद्रीला गेले होते. त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. पण त्यांनी त्यावेळीस एक वादग्रस्त वक्तव्य केले. जुन्नर तालुक्यामध्ये त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आढळराव यांनी लेण्याद्रीच्या दर्शनासाठी पैसे आकारण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली. पुरातन लेणी लेण्याद्रीच्या डोंगरांमध्ये असल्याने येथे येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभागाकडून प्रवेशशुल्क आकारण्यात येते. स्थानिकांचा याला विरोध आहे. आढळराव यांनी स्थानिकांची बाजू मांडताना, आमच्या सगळ्यांचे म्हणजेच ग्रामस्थ, देवस्थान असेल किंवा आमच्या तालुक्यातील सगळी जनता असेल सर्वांचे असे म्हणणे आहे की लेणी बघायला कोणी येत नाही. मी तर गेल्यावेळी त्यांना म्हणालो होतो, तुमची लेणी बघायला कुत्रीपण येत नाहीत. फक्त देवस्थानला जाण्यासाठी आम्हाला पैसे खर्च करावे लागतात हे चूक आहे. देवस्थानचे दर्शन पैसे खर्च करुन घ्यायचे असे भारतामध्ये कुठेच नाही. डायरेक्टर जनरलसहीत सर्वांनी ही बाब मान्य केली होती. तसेच मंत्र्यांनाही मान्य केल्याचे मत नोंदवले. आढळराव यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

आढळरावांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास गेलो होतो, तेव्हा आपण तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती आढळराव यांनी दिली. लेण्याद्रीला येणारे ९९ टक्के लोक देवदर्शनासाठी तर एक टक्का लोक लेणी पाहण्यासाठी येत असल्याचे अधिकाऱ्यांबरोबरच्या चर्चेतून समजले. मी यावेळी बोलताना बोली भाषेत ते शब्द वापरल्यामुळे माझा कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. मी भाविकांना मदत करण्यासाठी या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच दृष्टीने अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण आढळराव या प्रकरणाबद्दल देताना म्हणाले.

Leave a Comment